महापौरांनी साकारली कचऱ्यावर बाग
By admin | Published: June 6, 2017 01:27 AM2017-06-06T01:27:59+5:302017-06-06T01:27:59+5:30
कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसेंदिवस भीषण होत चाललेल्या कचराप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते; मात्र लोकप्रतिनिधी स्वत:च त्याचे अनुकरण करीत नाहीत, असा नागरिकांमध्ये समज असतो. या गैरसमजाला महापौर मुक्ता टिळक यांनी फाटा दिला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन ते साडेतीन टन कचरा जिरवून त्यांनी घराच्या छतावर सुंदरशी बाग तयार केली आहे.
शहरातील कचराप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणे हेसुद्धा पर्यावरणाचेच रक्षण आहे, या भावनेमधून टिळक यांनी घरामध्येच ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. सोसायट्यांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मितीचे प्रकल्प केल्यास, करामध्ये पाच टक्के सूट देण्यासही सुरुवात करण्यात आली होती. ओला कचरा जागच्या जागी जिरवण्यासंदर्भात पालिका; तसेच स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृतीवर भर देण्यात आला होता.
ओला कचरा जिरवला गेला, तर समस्या सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. लोकप्रतिनिधी लोकांना कचरा जिरवण्याचे आवाहन करतात; परंतु स्वत: त्याचे अनुकरण करीत नाहीत. टिळक यांनी मात्र घराच्या छतावर विटांचे बांधकाम असलेले दहा पिट्स तयार केले आहेत. या पिट्समध्ये ओला कचरा टाकून त्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केले जाते. या पिट्समध्ये त्यांनी झाडे लावली आहेत. यासोबतच छोट्या कुंड्यांमध्येही त्यांनी झाडे लावलेली आहेत. २ वर्षांपासून त्यांनी ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. आजवर या पिट्समध्ये जवळपास तीन ते साडेतीन टन ओला कचरा जिरवला गेल्याचे टिळक यांनी सांगितले.
>कचरा जिरवण्यासाठी पिट्स
या बागेमध्ये जवळपास २०० झाडे आहेत. यामध्ये गुलाब, पांढरा चाफा, मोगरा अशी फुलझाडे आहेत. डाळिंब, पपईची झाडे आहेत. कारल्याचा वेलही या बागेमध्ये आहे. घराच्या आवारात असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या छतावरही त्यांनी ओला कचरा जिरवण्यासाठी पिट्स तयार केलेली आहेत. त्याठिकाणीही झाडे लावणार असल्याचे टिळक यांनी सांगितले. दैनंदिन वापरातील भाज्यांचे देठं, शिळे अन्न, भाज्या कापल्यानंतर शिल्लक राहिलेला भाग या पिट्समध्ये टाकला जातो. महापौर स्वत: या बागेमध्ये अजूनही लक्ष देतात. घरातील देव्हाऱ्यात याच बागेतील फुले जातात. ओल्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापौरांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या या प्रयत्नांचे सर्वांनीच अनुकरण करायला हवे. पुणे महापालिकेकडून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
गेल्या दोन वर्षांपासून घराच्या छतावर ओला कचरा जिरवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास तीन ते साडेतीन टन कचरा जिरवला आहे. बागेमध्ये लावलेली सर्व झाडे छान आली आहेत. मी स्वत: बागेमध्ये लक्ष घालून ती जपली आहे. महापौर झाल्यापासून खूप वेळ देता येत नाही, परंतु शक्य होईल तेवढे बागेकडे लक्ष देते. नागरिकांनीही ओला कचरा आपल्या सोसायटीमध्ये, घराच्या छतावर जिरवल्यास कचराप्रश्न सुटण्यास त्याची मदतच होणार आहे.
- मुक्ता टिळक, महापौर, पुणे