महापौरांना जादा अधिकार मिळावे - महाडेश्वर
By Admin | Published: July 13, 2017 05:38 AM2017-07-13T05:38:07+5:302017-07-13T05:38:07+5:30
राज्यातील महापौरांना कार्यकारी अधिकार नाहीत, आयुक्तांना मात्र सर्व प्रकारचे अधिकार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महापौरांना कार्यकारी अधिकार नाहीत, आयुक्तांना मात्र सर्व प्रकारचे अधिकार आहेत. त्यामुळे महापौरांना जादा कार्यकारी अधिकार मिळायला हवेत, अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाडेश्वर हे राज्य महापौर परिषदेचे अध्यक्ष आहेत. नुकतीच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंधेरी पश्चिमेतील सभागृहात राज्य महापौर परिषदेची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिषदेचे संयोजक व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी परिषदेचे आयोजन केले होते. राज्यभरातील महापौर परिषदेला हजर होते. यावेळी महाडेश्वर म्हणाले, पालिका हद्दीत अचानक प्रसंग उद्भवल्यास आवश्यक कार्यवाहीचे अधिकार आयुक्तांना आहेत. तसेच अधिकार महापौरांना हवेत. महापौरांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर परिषदेत चर्चा झाली.