'मेयो'च्या अधिष्ठाता लाचखोरीत अडकल्या
By Admin | Published: January 16, 2017 09:16 PM2017-01-16T21:16:21+5:302017-01-16T21:16:21+5:30
औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बील मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो)
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्याचे बील मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) लाचखोर महिला अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहणेला साथीदारासह सोमवारी अटक करण्यात आली.
विजय मिश्रा (४४) असे अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव असून तो एनआरएच वसतिगृहात खासगी मेस चालवतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. तक्रारकर्ता हा औषध विक्रेता आहे. नागपुरात त्याचे औषधीचे दुकान आहे. जुलै-२०१५ मध्ये मेयो रुग्णालयाच्या वतीने अधिष्ठात्यांनी औषध पुरवठा करण्याबाबत निविदा काढली होती. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने निविदा भरली. निवेदेअंतर्गत तक्रारकर्त्यामने डिसेंबर-२०१६ हिवाळी अधिवेशनात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषधी पुरवठ केला. या औषधांची एकूण किम्मत २ लाख ९४ हजार ६६० रूपये इतकी होती. हे बील त्यांनी २८ डिसेंबर २०१६ रोजी मेयो रुग्णालयातील कार्यालयात मंजुरीसाठी सादर केले. परंतु ते बील मंजूर झाले नाही. अखेर तक्रारकर्ते हे या बिलाच्या मंजुरीसंदर्भात अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये-वाहाणे यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी बील मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागितली. तक्रारकर्त्यास ही लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कार्यालयात गेल्या १० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर व गोंदिया येथे पडताळणी केली. अखेर सोमवारी सापळा रचण्यात आला. डॉ. मिनाक्षी गजभिये-वाहणेला विजय मिश्रा याच्यामार्फत लाचेचे १५ हजार रूपये स्वीकारतांना पकडण्यात आले. विजय मिश्रा हा बाबुळखेडा येथे राहतो. तो एनआरएच हॉस्टेल येथे खासगी मेस चालवतो. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस शिपाई रणजित बिसेन, दिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदन बिसेन, दवानंद मारबते, मोनाली चौधरी, गजानन गाडगे, पल्लवी बोबडे आदींनी ही कारवाई केली.