‘राष्ट्रीय पक्ष्या’च्या संवर्धनासाठी राजभवनात ‘मयूर विहार’

By Admin | Published: July 2, 2016 02:27 AM2016-07-02T02:27:31+5:302016-07-02T02:27:31+5:30

राज्याच्या नैसर्गिक वैभवात भर घालणाऱ्या मोरांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे.

'Mayur Vihar' in Raj Bhavan for 'National Bird' | ‘राष्ट्रीय पक्ष्या’च्या संवर्धनासाठी राजभवनात ‘मयूर विहार’

‘राष्ट्रीय पक्ष्या’च्या संवर्धनासाठी राजभवनात ‘मयूर विहार’

googlenewsNext

स्नेहा मोरे,

मुंबई- राज्याच्या नैसर्गिक वैभवात भर घालणाऱ्या मोरांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजभवनात शुक्रवारी मोर संवर्धन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पासाठी मायव्हेट्स संस्थेने पुढाकार घेतला असून राजभवनात ‘मयूर विहार’ साकारण्यात आले आहे.
मायव्हेट्स संस्थेचे पशुवैद्यक डॉ. युवराज कागिनकर व डॉ. मधुरिता गुप्ता यांच्या संकल्पनेतून मयूर विहार प्रत्यक्षात आले आहे. या ‘मयूर विहार’मध्ये मोरांसाठी विविध सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. राजभवनातील निसर्गाला धक्का न पोहोचविता मोरांसाठी कृत्रिम पद्धतीने अधिवास निर्माण केला आहे.
या प्रकल्पाविषयी डॉ. मधुरिता गुप्ता यांनी सांगितले की, राज्यातील मोरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याविषयी वनमंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली होती. त्याच धर्तीवर राज्यपाल, वनमंत्री यांच्या सहयोगाने हा प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रयत्नाच्या माध्यमातून भविष्यात विविध ठिकाणी अशा प्रकारे मोरांच्या संवर्धनासाठी कृतिशील पाऊल उचलले जाईल, अशी आशा आहे.
>मोर का आवश्यक?
मोर हा पर्यावरणीय चक्राच्या संतुलनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. छोटे साप, उंदीर यांसह कीटकांचा मोर फडशा पाडतो. शिवाय राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराचे संवर्धन आवश्यक आहे.
केकावली आणि नृत्य
‘मयूर विहार’ परिसराचे फीत कापून उद्घाटन करता क्षणीच अवचित एका मोराने झाडावरून उतरत केकावली सुरू केली. जवळच असलेल्या तरणतलावाच्या बाजूला नृत्य सुरू केले. छायाचित्रकारांनी मोराची छबी टिपण्यासाठी एकच धडपड सुरू केली. यामुळे राज्यपाल आणि रतन टाटा यांनीही न राहवून मोराच्या नृत्याचा आनंद अनुभवला.
>मोरांचे नैसर्गिक निवाऱ्याचे वातावरण अबाधित
खुला पिंजरा : मुंगूस आणि सरपटणारे प्राणी यांच्यापासून सुरक्षित असलेला खुला पिंजरा तयार करण्यात आला आहे. १२ फूट उंच असणाऱ्या या पिंजऱ्याला कुंपण आहे.सॅन्ड बाथ पिट : या ठिकाणी छोटेखानी पांढऱ्या रंगाचे खड्डे करण्यात आले आहे. या छोट्या-छोट्या खड्ड्यांमध्ये मोरांना स्नान करण्याची सुविधा उपलब्ध आहे.कृत्रिम खाद्य : मोरांसाठी कृत्रिम खाद्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. अनेकविध फळांची लज्जत या मोरांना या ठिकाणी चाखायला मिळते. या ठिकाणांकडे मुंगूस, ससे पोहोचू नये याची दक्षता घेण्यात आली आहे.साठवण कक्ष : मोरांच्या खाद्यासाठी विशेष साठवण कक्ष आहे. या ठिकाणी मोरांसाठी आवश्यक धान्याची साठवण केली जाते. कृत्रिम आणि नैसर्गिक निवारा
या ठिकाणी नैसर्गिक निवाऱ्याचे वातावण अबाधित ठेवण्यात आले आहे. जेणेकरून लांडोरला प्रजनन काळात अधिवासाशी जुळवून घेणे सोपे होईल. शिवाय, कृत्रिमरीत्या छोटेखानी घरटेसदृश जागाही बनविण्यात आली आहे. तसेच, सरपटणारे प्राणी आणि मुंगूस दूर राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे.उपचार कक्ष : या ठिकाणी मोरांना योग्य आणि त्वरित उपचार मिळावे, याकरिता उपचार कक्षही तयार करण्यात आला आहे. आजारी मोरांना या ठिकाणी सुरक्षितपणे ठेवता येऊ शकेल, त्यानंतर बरे होईपर्यंतच
उपचार कक्षात मोरांना ठेवण्याची सोय आहे.

Web Title: 'Mayur Vihar' in Raj Bhavan for 'National Bird'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.