मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढली

By admin | Published: May 24, 2016 06:45 PM2016-05-24T18:45:55+5:302016-05-24T19:22:38+5:30

बारामती तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणांची संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला केलेल्या प्राणीगणनेत स्पष्ट झाले आहे

In the Mayureshwar sanctuary the number of chinkara deer is increased | मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढली

मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढली

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 24- बारामती तालुक्यातील चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणांची संख्या वाढल्याचे बुद्ध पौर्णिमेला केलेल्या प्राणीगणनेत स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या प्राणीगणनेत २५७ एवढी असणारी चिंकारांची संख्या या वेळी २७४ इतकी झाल्याची माहिती मयूरेश्वर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. नागोसे यांनी दिली. या प्राणीगणनेत दुर्मिळ गेकुलिपर्ड जातीची पाल आढळून आली. 

बारामती तालुक्यातील काही भाग अवर्षणप्रवण असला तरी या भागात गवताची मैदाने आहेत. ही गवताची मैदानेच चिंकारा हरणांसाठी नैसर्गिक अधिवासाची ठिकाणे आहेत. त्यामुळे तालुक्यात मयूरेश्वर अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर बारामती शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात तांदुळवाडी गावच्या हद्दीतही दोन वर्षांपूर्वी चिंकारा वनउद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षीनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. चिंकारा उद्यानामध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर या उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आवळा, कांचन, बेहडा, हिरडा, फणस, कोकम, करवंद, कण्हेर आदी विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे.
मयूरेश्वर अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेत कुतवळवाडी दर्गा, बोअरवेल हातपंप, टॉवरशेजारी, सिमेंट टँक, नवीन वॉटर होल, झिरो पॉर्इंट, नवीन हापसा ६५ मिरे, निसर्ग परिचय केंद्र अशा आठ ठिकाणच्या पाणवठ्यांवर वनविभागाच्या ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह हंगामी वनमजुरांच्या मदतीने ही प्राणीगणना शनिवारी (दि. २१) बुद्ध पौर्णिमेदिवशी करण्यात आली. या प्रगणनेत १५ वन्यप्रेमींनी सहभाग घेतला होता. या प्रगणनेमध्ये २७४ चिंकारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १३२ माद्या, ११० नर, तर ३२ पाडसांचा समावेश आहे.

चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजना
गतवर्षी झालेल्या प्रगणनेमध्ये २५७ चिंकारांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये १३८ माद्या, ९२ नर, तर २७ पाडसांचा समावेश होता. गतवर्षीपेक्षा यावर्षी माद्यांची संख्या कमी नोंदवली गेली असली तरी नरांच्या व पाडसांच्या संख्येत वाढ झाली आहे. यावर्षीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याच्या आणि पाण्याच्या कमतरतेतही वाढ चांगली असल्याचे स्पष्ट होत आहे. मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. या प्रगणनेदरम्यान चिंकारांबरोबच या परिसरात १२ ससे, ३ खोकड, २ लांडगे, ३ तरस, १ रानडुक्कर, खार, गेकूलिपर्ड (पालीचा एक दुर्मिळ प्रकार) यांसारखे प्राणी आढळून आले. त्याचबरोबर मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटिक, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल, भारद्वाज हे पक्षीही आढळून आल्याची माहिती नागोसे यांनी दिली.

Web Title: In the Mayureshwar sanctuary the number of chinkara deer is increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.