भुयारी मार्गाला अखेर मुहूर्त!
By admin | Published: April 20, 2015 02:38 AM2015-04-20T02:38:38+5:302015-04-20T02:38:38+5:30
वर्षभरापासून निधीअभावी रखडलेल्या रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गाच्या कामाला मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला तीन कोटींचा भरणा
भार्इंदर : वर्षभरापासून निधीअभावी रखडलेल्या रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गाच्या कामाला मीरा-भार्इंदर महानगरपालिकेने पश्चिम रेल्वेला तीन कोटींचा भरणा केल्यानंतर गती मिळाली. पालिकेकडून ७ कोटी रुपये अदा न झाल्याने मे महिन्यापासून पश्चिम रेल्वेने या भुयारी मार्गाचे काम बंद केले होते.
शहरातील वाहतुकीचे नियोजन व्हावे, यासाठी २० नोव्हेंबर २००९ च्या महासभेत भुयारी वाहतूक मार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, रेल्वेने प्रकल्पाचे काम सुरू करण्यास वर्षभरानंतर मंजुरी दिल्याने प्रकल्पाची सुरुवात विलंबाने झाली. शिवाय, रेल्वेच्या जागेचा वापर केल्यापोटी रेल्वेने पालिकेकडे ७ कोटींच्या लेव्हिएबल चार्जेसची मागणी केली. ही थकीत रक्कम पालिकेने न भरल्यामुळे रेल्वेने प्रकल्पाचे काम मे २०१४ पासून बंद पाडले. गेल्या ८ महिन्यांपासून बंद पडलेले काम सुरू करण्याच्या उद्देशाने पालिकेने जानेवारी २०१५ मध्ये रेल्वेकडे ३ कोटींचा भरणा केल्याने प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात असून यंदाच्या अंदाजपत्रकात २० कोटींची तरतूददेखील केली आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले की, भुयारी मार्गासाठी केलेल्या तरतुदीनुसार निधी उपलब्ध झाल्यास रेल्वेच्या थकीत ४ कोटींचा भरणा करण्यात येणार आहे. हा
प्रकल्प येत्या वर्षात पूर्ण
करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)