‘एमबीए’ त प्रवेशाची मंदी
By admin | Published: August 4, 2014 12:50 AM2014-08-04T00:50:13+5:302014-08-04T00:50:13+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व
‘कॅप’मध्ये विद्यार्थ्यांचा निरुत्साह : विभागातील केवळ ४५ टक्के जागा भरल्या
नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये केवळ ४५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रचंड निरुत्साह व महाविद्यालयांचा घसरता दर्जा यांचा फटका प्रवेशप्रक्रियेला बसला. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली असल्याचे या आकडेवारीने स्पष्ट केले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. याअंतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले प्रवेश होतील अशी महाविद्यालयांना अपेक्षा होती. परंतु ती सपशेल फोल ठरली. शेवटच्या फेरीनंतर नागपूर विभागात जवळपास ‘कॅप’ अंतर्गत येणाऱ्या ५५ टक्के जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे निरनिराळ््या ५२ महाविद्यालयांतील ‘कॅप’अंतर्गत येणाऱ्या एकूण ४,०४७ जागांपैकी केवळ १,८२६ जागांवरच प्रवेश झाले. तीनही फेऱ्यांअखेरच चक्क २,२२१ जागा रिक्त राहिल्याने या रिकाम्या जागांचे करायचे तरी काय असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.(प्रतिनिधी)
महाविद्यालयांसमोर आव्हान
‘कॅप’ अंतर्गत २,२२१ जागा रिक्त राहिल्या असून इतर कोट्यातील जागांना भरण्याचेदेखील आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यात संस्थास्तर, अल्पसंख्यक संस्था यांचादेखील समावेश आहे. नागपूर विभागात या सर्व मिळून एकूण ४,६०८ जागा उपलब्ध आहेत. यापैकी २,७८२ म्हणजेच सुमारे ६० टक्के जागा रिक्त आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह
एमबीएला प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. हव्या त्या प्रमाणात नोकरी मिळत नसणे हे याचे सगळ््यात मोठे कारण आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविल्या जातात. मात्र त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. अनेक महाविद्यालयांत तर योग्य प्राध्यापक व सोयीसुविधा देखील नाहीत. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली.