एमसीएच्या फडात राजकीय कुरघोडी
By admin | Published: June 10, 2015 03:12 AM2015-06-10T03:12:55+5:302015-06-10T03:12:55+5:30
एमसीएच्या निवडणुकीत राजकीय कुरघोडी रंगली आहे. क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) त्रैवार्षिक निवडणुकीत राजकीय कुरघोडी रंगली आहे. क्रिकेट फर्स्ट गटाचे विजय पाटील यांनी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, शिवसेना खा. राहुल शेवाळे, आ. प्रताप सरनाईक उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट फर्स्ट पॅनलला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी-भाजपा आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेना-काँग्रेस असे नवीन समीकरण समोर आले आहे.
बुधवार, १७ जून रोजी एमसीएच्या १७ सदस्यीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार यांना क्रिकेट फर्स्ट आणि बाळ म्हाडदळकर या दोन्ही गटांचा पाठिंबा असल्याने पवारांची निवड निश्चित मानली जात होती. गेल्या वेळी पवारांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र यंदा शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे क्रिकेट फर्स्ट पॅनेलने विजय पाटील यांच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी उतरवला आहे. क्रिकेट फर्स्ट गटाला मागील निवडणुकीत १७पैकी केवळ ४ जागा राखता आल्या होत्या. यंदा शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे क्रिकेट फर्स्टचे बळ वाढले आहे. एमसीएचे मतदार असणाऱ्या ३२९ क्लब व संस्थांपैकी ४५ संस्थांवर थेट शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवाय नवी मुंबईत भव्य असे डी.वाय. पाटील स्टेडियम उभारणाऱ्या विजय पाटील यांचा स्वत:चा संपर्क मोठा आहे. २०११पासून पाटील एमसीएचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
चुरशीची लढत
अध्यक्षासह उपाध्यक्षपदासाठी यंदा मोठी चुरस असेल. पवार-म्हाडदळकर गटाकडून मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी दावा ठोकला आहे. तर, क्रिकेट फर्स्टकडून शिवसेना खा. राहुल शेवाळे आणि आ. प्रताप सरनाईक मैदानात आहेत.