सुजलाम् कंपनीत १४ वर्षांपासून एमडीचा कारभार
By admin | Published: May 28, 2017 02:00 AM2017-05-28T02:00:23+5:302017-05-28T02:00:23+5:30
पुण्याच्या सुजलाम् कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून एमडीचा कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, सुरुवातीला एमडीचा समावेश
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्याच्या सुजलाम् कंपनीत गेल्या १४ वर्षांपासून एमडीचा कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, सुरुवातीला एमडीचा समावेश अमलीपदार्थांमध्ये करण्यात आला नसल्याने, सुजलाम् कंपनीचा कारभार नित्यनेमाने सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, महिनाभरापूर्वीच अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) या कंपनीची पडताळणी झाली होती. त्यामध्ये कुठलाच गैरप्रकार आढळून आला नसल्याने, कंपनीला ग्रीन सिग्नल देण्यात आला.
अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मानखुर्द जकात नाक्यावर पुण्यातील तस्कर हरिश्चंद्र नानासाहेब डोरजे (५२) याला बेड्या ठोकून, कोट्यवधींचा एमडी जप्त करत कंपनीला टाळे ठोकले. धक्कादायक म्हणजे, एफडीएने कंपनीची वेळोवेळी तपासणी केली. एप्रिल महिन्यातही तिची शेवटची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातही त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुळात एमडीचा औषधांत समावेश होत नाही, त्यामुळे त्याचा तपशील नसल्याचेही कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे एवढ्या वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या या अमलीपदार्थांच्या कारभाराला नेमके जबाबदार कोण, असा सवाल आता जनतेमधून उपस्थित केला जात आहे.