मी, आर आर...
By admin | Published: February 17, 2015 02:09 AM2015-02-17T02:09:48+5:302015-02-17T02:09:48+5:30
नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे.
नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे. १६ आॅगस्ट १९५७ रोजी म्सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म. अंजनी हे जन्मगाव. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी श्रमदान करुन शिकलो. सांगलीच्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.
राजकीय जीवनामध्ये मी १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य, नंतर १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये मी विधानसभेवर निवडून आलो. ग्रामविकासमंत्री म्हणून जे ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियान’ मी राबवलं, त्यामुळे पवारसाहेब आणि जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं. मी ब्लॉगच्या निमित्ताने जे तुम्हाला सांगतो, ते सांगताना सुद्धा फार संकोच वाटतो. गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी पवारसाहेबांनी दिली. हे काम निष्ठेने व पवारसाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात किती यश आले हे जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.
माझ्या आयुष्यावर यशवंतराव चव्हाण, महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरुन भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी जनतेत पोलिसांमार्फत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी, क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात फार यश आले अथवा नाही, याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.
मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्यासोबत बसून गप्पा मारायला आवडतात. त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे, असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. सत्ता, पैसे येतात आणि जातात. पण जोडलेली माणसे आणि जिवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते.