आरोग्य खात्यात ‘अर्थपूर्ण’ बदल्या; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Published: June 18, 2016 05:03 AM2016-06-18T05:03:08+5:302016-06-18T05:03:08+5:30

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले असल्याची लेखी तक्रार शासकीय वैद्यकीय अधिकारी राहुल घुुले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'Meaningful' transfers in health account; Complaint to the Chief Minister | आरोग्य खात्यात ‘अर्थपूर्ण’ बदल्या; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आरोग्य खात्यात ‘अर्थपूर्ण’ बदल्या; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Next

- यदु जोशी, मुंबई

सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले असल्याची लेखी तक्रार शासकीय वैद्यकीय अधिकारी राहुल घुुले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांना या प्रकरणात पदावरून हटविण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.
२५ मे ते ३१ मे दरम्यान बदल्यांचा काळ होता. तेव्हा मंत्र्यांचे खासगी सचिव माळी हे जी.टी.रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या दालनात बसून असत. सीसीटीव्ही फुटेजवरून हे लगेच लक्षात येईल. आरोग्य संचालकांच्या दालनात बसून ते या काळात काय करीत होते. अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांनी सोईच्या बदल्या करवून घेण्यात भूमिका वठविली काय, याची चौकशी करण्याची मागणीही डॉ.घुले यांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकारी गट अ मधील २६७ बदल्यांपैकी पहिल्या १९ बदल्या फक्त अहमदनगर जिल्ह्यातच का करण्यात आल्या, २३ जिल्हा आरोग्य अधिकारी बढतीमध्ये सर्व जण ५५ ते ५६ वयोगटाचे आहेत. त्यांना मुद्दाम त्यांचा जिल्हा वगळून इतरत्र का टाकण्यात आले, असा सवाल डॉ.घुुले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
औषध खरेदी घोटाळा उघडकीस येताच आरोग्य संचालकांसारख्या ज्येष्ठतम अधिकाऱ्यास निलंबित करण्याची भूमिका आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी घेतली होती. आता माळी यांच्याविरुद्ध कारवाई करणार का, असा सवाल केला जात आहे. एका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक शोषणाच्या गंभीर तक्रारी आहेत. त्याची शिक्षा म्हणून बदली करण्याऐवजी विनंती बदली करण्यामागे असलेल्या विशेष कारणांचीही विभागात चर्चा आहे. एका एमबीबीएस झालेल्या अधिकाऱ्याची बदली अस्थिरोग तज्ज्ञ या पदावर का करण्यात आली, याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.
------------------------------------------------
महसूलचा कित्ता गिरवणार?
महसूल विभागातील बदल्यांची शिफारस नागरी सेवा मंडळाच्या माध्यमातून झालेली नसल्याने या बदल्याच मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केल्या. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर हा निर्णय घेतला होता. सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांही नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय करण्यात आलेल्या आहेत, अशी तक्रार आहे. त्यामुळे आता या बदल्यांबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात या बाबत उत्सुकता आहे.
-------------------------------------------------
कोण आहेत डॉ.घुुले?
बदल्यांमधील घोटाळ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणारे डॉ.राहुल घुले हे मध्यंतरी आर्थर रोड जेलचे वैद्यकीय अधिकारी होते. तेव्हा तेथे व्हीआयपी कैद्यांचे चोचले पुरविले जातात, कैद्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी जेल प्रशासनाकडून पैसे घेतले जातात, असे गंभीर आरोप त्यांनी केले होते. त्यानंतर डॉ.घुले यांची अलिबागला बदली करण्यात आली.
-------------------------------------------------
जम्बो बदल्याचा धडाका
आरोग्य विभागात यंदा जम्बो बदल्या करण्यात आल्या. गट अ च्या २६७, गट बच्या ११९, गट कच्या ३६६९ तर गट बच्या २२०० बदल्या झाल्या. बदल्यांचा कायदा धाब्यावर बसवून अनेक बदल्या झाल्याचे म्हटले जात आहे. ज्या पद्धतीने बदल्यांचे ‘सेटिंग’ चालले होते त्यावरून अस्वस्थ झालेले आरोग्य सचिव आणि आरोग्य संचालकांनी जीटी रुग्णालयातील ‘हालचालींना’ विरोधही केला होता, अशी माहिती पुढे आली आहे.
--------------------------------------
बदल्या नियमबाह्य झाल्याची ‘स्पेसिफिक’ उदाहरणे डॉ. घुले यांनी द्यावीत. मी त्याची चौकशी करेन. बदल्यांमध्ये नियमानुसार प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. निवड मंडळाची बैठक होऊन निर्णय झाले. बदली अधिकारांचे विकेंद्रीकरण केलेले आहे. मी आमदारांच्या पत्रावरून बदल्या केल्या त्यातही डॉक्यूमेंटस तपासून घेतले.
- डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री.
 

Web Title: 'Meaningful' transfers in health account; Complaint to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.