भीमा नदीवरील पूल मोजतोय घटका
By admin | Published: August 6, 2016 01:01 AM2016-08-06T01:01:26+5:302016-08-06T01:01:26+5:30
भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही
दौंड : दौंड-नगर रस्त्यावर भीमा नदीवर असलेला पूल शेवटची आऊट घटका मोजत असून, हा पूल कधी कोसळेल आणि वाहनांना कधी जलसमाधी मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. तरीदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे या पुलावरून वाहतुकीची वर्दळ सुरूच आहे.
शासनाला या पुलाची डागडुजी करण्यासाठी वेळ नसल्याची वस्तुस्थिती आहे. मुळातच पुलावरील अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे रस्त्यासह पुलाचे खांब झिजत चालले आहेत. एखादे मोठे वाहन भरधाव या पुलावरून गेल्यावर पुलाला हादरे बसतात.
सदरचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे. या पुलासंदर्भात वेळोवेळी खबरदारीचे उपाय म्हणून ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, केवळ शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा पूल कमकुवत होत चालला आहे. श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जाण्यासाठी राज्य आणि परराज्यातील भाविकांना याच पुलावरून प्रवास करावा लागतो. तसेच अन्य मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे. या पुलासंदर्भात विपरित घटना घडली, तर नवीन पूल तयार होईपर्यंत दौंड-नगर वाहतूक बंद राहील. यात सर्वसामान्य जनतेसह शासनाचेही नुकसान होऊ शकते. या पुलाव्यतिरिक्त नगरकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. (वार्ताहर)
>...तर वाहनांना जलसमाधी
भीमा नदीवरील पुलाला
पाहिजे तसे भक्कम संरक्षक कठडे नाहीत, तर या पुलावर रात्रीच्या वेळेला अंधाराचे साम्राज्य असते. एखाद्या वेळेस वाहनावरील चालकाचा ताबा सुटला, तर वाहन सरळ नदीत कोसळून विपरीत घडू शकते.