यंत्रणा कोलमडली

By admin | Published: July 15, 2017 01:38 AM2017-07-15T01:38:14+5:302017-07-15T01:38:14+5:30

विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यात आल्यामुळे तब्बल ५ हजार विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

Mechanism collapsed | यंत्रणा कोलमडली

यंत्रणा कोलमडली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अकरावी प्रवेश प्रक्रिया पहिली फेरीनंतरच कोलमडली असल्याचे चित्र आहे. यंदा पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय स्वीकारण्याची विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यात आल्यामुळे तब्बल ५ हजार विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडले असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे तसेच ४३ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. केंद्रीय प्रवेश समितीच्या एककल्ली कारभारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविली जात आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी केवळ ३४ हजार ९८० विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी अखेर प्रवेश मिळू शकला आहे. यंदा विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेले महाविद्यालय घेतलेच पहिजे अशी जबरदस्ती त्यांच्यावर करण्यात आली होती. पहिला पसंतीक्रम मिळालेल्या ४ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यामुळे नव्या नियमानुसार ते आता प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी हे ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे गुणवत्ताधारक आहेत. त्यांच्या चांगल्या गुणांमुळेच त्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले होते. मात्र समितीच्या जबरदस्तीमुळे त्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्षच अडचणीत आले आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार ४८ हजार ३२४ विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी केवळ २४ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. उर्वरित २३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्याचबरोबर पहिल्या फेरीत प्रवेशाच्या प्रतिक्षेत राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८०६ इतकी आहे. त्यामुळे एकूण ४३ हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. १० हजार ३०८ विद्यार्थ्यांनी विविध कोटयाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत.
समितीने प्रवेशासाठी केवळ साडे तीन दिवसांची मुदत दिल्याने विद्यार्थी व पालकांना प्रवेशासाठी मोठी धावाधाव करावी लागली. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही घेता आल्या नसल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहेत. गुरूवार अखेरपर्यंत २४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नव्हता. त्याचवेळी समितीने प्रवेश प्रक्रियेला किमान दोन दिवसांची मुदतवाढ देणे अपेक्षित होते, मात्र केवळ गुरूवारी दुपारी १२ पर्यंत मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे गुरूवारी दुपारी प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले. यामुळे प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परत फिरावे लागले.
>आॅनलाइन : पुढील फेऱ्यांबाबत संभ्रम
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीच्या समाप्तीनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभुमीवर दुसरी फेरी कधीपासून राबविली जाणार, प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या ५ हजार विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार, सर्व ४३ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार ना असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर व सहायक शिक्षण संचालक मिनाक्षी राऊत यांनी रात्री उशीरपर्यंत कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.
>किचकट प्रक्रियेने गोंधळले पालक अन् विद्यार्थी
सहज व सोप्या पध्दतीने हजारो विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश पडावेत म्हणून केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र समितीकडून विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या किचकट प्रक्रियेमुळे पालक व विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून गेले आहेत.

Web Title: Mechanism collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.