अपघात रोखण्यासाठी यंत्रणा
By admin | Published: June 8, 2016 03:35 AM2016-06-08T03:35:11+5:302016-06-08T03:36:23+5:30
अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अपघात रोखण्यासाठी संपूर्ण महामार्गावर ब्रिफेन वायरही उभारण्यात येणार आहेत. रविवारी पहाटे पनवेलजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासंदर्भात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम अंतर्गत कमांड सेंटरसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्हीचे जाळे उभे केले जाणार आहे. शिवाय ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग आणि ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलिसांबरोबरच डेल्टा फोर्सच्या १०० जणांचे कृती दल उभारले जाणार आहे. त्यांना विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. महामार्गाच्या सुरक्षिततेवरही भर दिला जाईल. यात इंजिनीअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी यांचा समावेश आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामार्ग पोलीस आणि परिवहन या विभागांनी ३६५ दिवस पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दरम्यान, या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री विजय देशमुख आणि गृह, आरोग्य, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशनचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आणि सामाजिक कार्यकर्ते तन्मय पेंडसे उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
>सुरक्षेच्या उपाययोजनांचे सादरीकरण
द्रुुतगती महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी आजवर काय उपाययोजना केल्या, याचे सादरीकरण एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले. सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करायला हवे, याचे सादरीकरण जयंतकुमार बांठिया आणि तन्मय पेंडसे यांनी बैठकीत केले.
ओझर्डे येथे एमएसआरडीसीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ट्रॉमा सेंटर तातडीने पीपीपी तत्त्वावर चालू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसेच, एअर अॅम्ब्युलन्सचा प्रस्तावही तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
>नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे :
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर महिन्यातून दोन वेळा महामार्ग पोलीस व आरटीओ यांच्यामार्फत संयुक्त वाहन तपासणी मोहीम राबविणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. प्रसंगी वाहकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असेही रावते यांनी सांगितले. राज्य रस्ता सुरक्षा परिषद समितीची बैठक मंत्रालयात रावते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर रावते यांनी बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.