उमेदवारीसाठी डावललेल्या मेधा कुलकर्णींचं 'येथे' होणार पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 04:19 PM2019-10-01T16:19:21+5:302019-10-01T18:56:00+5:30
कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते.
मुंबई - पुण्यातील कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलून चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पाटील यांच्याविरुद्ध कोथरूडमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली असून ब्राह्मणच उमेदवार असावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांना मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात यश आले आहे.
चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे.
कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. तसेच ब्राह्मणच उमेदवार हवा, अस सांगत मेधा कुलकर्णी यांनाच पाठिंबा दर्शविला होता. त्यातच कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते.
चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र आता ही विधान परिषदेची जागा पाटील मेधा कुलकर्णी यांना देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेवर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन होणार हे निश्चित मानले जात आहे.