पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी मेधा कुलकर्णी-मुक्ता टिळक यांच्यात चुरस ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:46 AM2019-08-21T11:46:01+5:302019-08-21T11:47:46+5:30
कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र इच्छुकांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजपने पुन्हा शतप्रतीशतचा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही मतदारसंघात उमेदवारीत बदल होण्याची शक्यता आहे. कोथरूड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. परंतु, भाजपकडून जिल्ह्यात महिला प्रतिनिधीत्व कायम राखण्यात येणार असल्यामुळे मुक्ता टिळक यांना कसबा मतदार संघातून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे उमेदवारीसाठी मतदारसंघ वेगळे असले तरी चुरस मेधा कुलकर्णी आणि मुक्ता टिळक यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, ऐनवेळी विनोद तावडे यांनी ताकत उभी केल्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यांनी तेथून विजय मिळवला. परंतु, यावेळी मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांच्या जागी मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील मोहोळ यांच्या नावाची चर्चा झाली होती. परंतु, भाजपने तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनाच लोकसभेत पाठवले.
दरम्यान कोथरूड मतदार संघातून मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलली तरी, भाजपकडून पुण्यात महिला प्रतिनिधीचे संख्याबळ कायम ठेवण्यात येणार आहे. अशा स्थितीत, मेधा कुलकर्णी यांना डावलून कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जेणे करून पुण्यातील महिला प्रतिनिधीत्वाचा आकडा कायम ठेवता येईल.
एकूणच मेधा कुलकर्णी आणि मुक्ता टिळक यांचा मतदारसंघ वेगळा असूनही केवळ महिला प्रतिनिधीत्वामुळे दोघींमध्ये उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. वास्तविक पाहता कसबा मतदार संघातून धीरज घाटे, गणेश बीडकर आणि गिरीश बापट यांच्या सुनेचे नावही चर्चेत आहे. परंतु, मुक्ता टिळक यांचेच नाव आघाडीवर दिसत आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशीची चर्चा होती. तसं झाल्यास पुण्यातील भाजपच्या उमेदवारीची समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.