पुलवामा घटनेआड मोदींकडून जमिनींचे सौदे, मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 09:21 PM2019-04-16T21:21:08+5:302019-04-16T21:22:41+5:30

पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला

Medha Patkar serious allegation on Narendra Modi | पुलवामा घटनेआड मोदींकडून जमिनींचे सौदे, मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

पुलवामा घटनेआड मोदींकडून जमिनींचे सौदे, मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

 सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीत केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात महिला मेळावा पार पडला. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रभारी सोनलबेन पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा पूजा मोरे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या. 

पाटकर म्हणाल्या की, देशातील सरकार हे जाती-जातीत विष पेरणारे, महिलांविरोधी, आदिवासी, दलितांना उद्ध्वस्त करणारे, देशात कंपनीराज आणू पाहणारे आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवरून हटविणे भारतीयांचे कर्तव्य आहे. पुलवामाची घटना घडल्यानंतर त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सरकारने केला. या घटनेने देश हादरला असताना, तब्बल १ लाख ७0 हजार हेक्टर जमिनींचा सौदा खाण कंपन्यांशी करण्यात आला. निवडणुका संपताच गोरगरीब आदिवासी, दलितांच्या जमिनी या कंपन्या ताब्यात घेतील. निसर्गाची नको तेवढी हानी करून आपल्या देशाचे, भौगोलिक परिस्थितीचे शोषण करतील. या सौद्याबरोबरच अदानीच्या कंपनीला आठ विमानतळही त्यांनी विकून टाकली. 

अशाप्रकारच्या देशविरोधी गोष्टी हे सरकार करीत आहे. ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी एक कंपनी आणली होती. मात्र नरेंद्र मोदी या देशात हजारो कंपन्या आणून कंपनीराज करू पाहताहेत. या देशात कंपन्या कधीही कर्जबाजारी होत नाहीत, मात्र कष्टकरी, शेतकरी नेहमीच कर्जबाजारी राहतो, हे दुर्दैव आहे. देशातील १ टक्का लोकांकडेच देशाची ८0 टक्के संपत्ती एकवटण्याचे हेच एकमेव कारण आहे. जनआंदोलने आणि पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा देशविरोधी गोष्टींना रोखण्याचा विषय असतो. त्याचप्रमाणे देशाच्या हिताविरोधात काम करणाºयांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही पाटकर म्हणाल्या. 

सोनलबेन पटेल म्हणाल्या की, मोदींनी ज्या गुजरात पॅटर्नचा गाजावाजा देशभर केला, तो निव्वळ फसवा होता. याठिकाणच्या महिलांच्या, सामान्य लोकांच्या समस्या अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. कोणताही विकास न करता विकासाचा दावा ते करीत आहेत. शिक्षण व्यवस्था महाग करून गरिबांच्या मुला-मुलींना या प्रवाहापासून रोखण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. त्यामुळे त्यास मतांमधून विरोध केला पाहिजे. 
पूजा मोरे म्हणाल्या की, मुलींना पळवून नेण्याची भाषा करणारे, मुलींवर अत्याचार करणारे आणि मराठा समाजाच्या मोर्चाची, त्यांच्या मुलींची थट्टा करणारे हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात आता केवळ शेतकरीच आत्महत्या करीत नसून, त्यांच्या मुलीसुद्धा आत्महत्या करू लागल्या आहेत. या परिस्थितीतही या सरकारला या गोष्टीची खंत व शरम वाटत नाही. त्यामुळे झाशीच्या राणीप्रमाणे आता महिलांनी पेटून उठावे आणि भाजप सरकारला सत्तेवरून खेचावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉँग्रेसच्या मनीषा तिवारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रोटे, राष्टÑवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, पूजा पाटील यांनी भाषणे केली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका रोहिणी पाटील, मालन मोहिते, सुवर्णा पाटील, शुभांगी साळुंखे आदी उपस्थित होते.

Web Title: Medha Patkar serious allegation on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.