‘टिस’च्या लढ्यात मेधा पाटकरांची उडी, सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:47 AM2018-02-26T03:47:47+5:302018-02-26T03:47:47+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्काच्या शिष्यवृत्तीपोटी मिळणारा निधी बंद केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेतील (टिस) विद्यार्थ्यांनी बुधवार रात्रीपासून महाविद्यालय बंद आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्काच्या शिष्यवृत्तीपोटी मिळणारा निधी बंद केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेतील (टिस) विद्यार्थ्यांनी बुधवार रात्रीपासून महाविद्यालय बंद आंदोलन सुरू केले आहे. या लढ्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही उडी घेतली असून शासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मेधा पाटकर सदस्य असलेल्या नॅशनल अलायन्स आॅफ पीपल्स मूव्हमेंट या संघटनेने टिसच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. यासंदर्भात पाटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शासनाने पूर्वीप्रमाणेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. मुळात शिक्षणाचे खासगीकरण करताना किमान सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संस्थांचा निधी तरी बंद करण्याची गरज नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांविरोधात धोरण आखणाºया सरकारने नीती बदलांविषयी गांभीर्याने विचार करायला हवा. टिस प्रशासनानेही विद्यार्थी आणि शिक्षकवर्गासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. मुळात युती सरकारच्या नीती बदलांविरोधात दिल्लीमधून संघर्षाला सुरुवात झाली आहे. टिसचा लढा हा त्याचाच एक भाग असून गरज पडल्यास चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची तयारीही पाटकर यांनी व्यक्त केली.
टिसच्या मुंबईसह तुळजापूर, गुवाहाटी आणि हैदराबाद या ठिकाणी संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन पाटकर यांच्या संघटनेने केले आहे. संघटनेने केलेल्या मागण्यांत केंद्र शासन, यूजीसी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधत ही शिष्यवृत्ती पुन: सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा मिळवून देण्याची गरज व्यक्त केली आहे.