मेधा लोकल धावली!
By Admin | Published: March 19, 2017 02:04 AM2017-03-19T02:04:44+5:302017-03-19T02:04:44+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बसविलेली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर स्वदेशी बनावटीची पहिली मेधा लोकल सुरू करण्यात आली. लोकलमधील संपुर्ण विद्युत यंत्रणा भारतीय तंत्रज्ञांनी बसविलेली आहे. मेधा लोकल दादर ते बोरीवली धिम्या मार्गावर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना करण्यात आली.
‘तेजस’ ट्रेन येत्या काही दिवसांमध्ये तर ‘उदय’ ट्रेन मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. रेल्वे संबंधीच्या विविध सोईसुविधांचे उद्घाटन शनिवारी प्रभू यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. कुर्ला पूर्वेकडील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान, अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर, व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे इतर सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
सुरेश प्रभू या वेळी म्हणाले की, देशातील प्रत्येक स्थानकावर डिजिटल डिस्प्ले लावण्यात येणार आहेत. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ४० हजार कोटींची आर्डर देण्यात आली आहे. आयात कमी करण्यासह देशांतर्गत निर्मितीवर जास्त भर देण्यात येणार आहे. विशेषत: साडे तीन लाख कोटींची गुंतवणूक रेल्वेमध्ये करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी २२ हजार २६७ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये १ लाख ३७ हजार लाख रुपयांपेक्षा अधिक निधीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई शहरासाठी ५१ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
नगर-परळी रेल्वे लाइनच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
नगर-बीड-परळी या बहुप्रतीक्षित रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, नगर ते नारायणडोहो या १० किलोमीटरच्या थांब्यापर्यंत सात डब्यांची रेल्वे शुक्रवारी धावली. याच मार्गावरील बुरुडगाव रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पणही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या वेळेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.
नगर-परळी या सुमारे २५० किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. १४०० कोटींहून अधिक खर्चाच्या या कामास पाच वर्षांपासू गती मिळाली आहे. राज्य सरकारने चालू अर्थसंकल्पात त्यासाठी ४९ कोटींची तरतूद केली आहे. नगर ते नारायणडोहो या पहिल्या १० किमीचे काम पूर्ण झाले. मागील महिन्यात या मार्गादरम्यान रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात
आली. गेल्या आठवड्यापासून या मार्गावर सात डब्यांची रेल्वे धावण्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गावरील पूल,
भराव, क्रॉसिंग, तसेच तांत्रिक
बाबींची पाहणी केली.