महाराष्ट्रातील रँकवर वैद्यकीय प्रवेशाचे गणित अवलंबून, कॅटेगिरी रँकिंगही महत्त्वाची 

By अविनाश कोळी | Published: June 18, 2024 12:51 PM2024-06-18T12:51:58+5:302024-06-18T12:53:18+5:30

अन्य राज्यांतील प्रवेशाचे मार्गही मोकळे

Medical admission Mathematics depends on rank in Maharashtra, category ranking is also important  | महाराष्ट्रातील रँकवर वैद्यकीय प्रवेशाचे गणित अवलंबून, कॅटेगिरी रँकिंगही महत्त्वाची 

महाराष्ट्रातील रँकवर वैद्यकीय प्रवेशाचे गणित अवलंबून, कॅटेगिरी रँकिंगही महत्त्वाची 

अविनाश कोळी

सांगली : दीड हजारावर विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्क रद्दमुळे वैद्यकीय प्रवेशातील ऑल इंडिया रँकमध्ये फार काही फरक पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी आता स्टेट मेरीट लिस्टवर विसंबून आहेत. आरक्षित प्रवर्गानुसार लागणाऱ्या स्वतंत्र रँकमुळेही विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो, असे मत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशकांनी व्यक्त केले आहे.

‘नीट’च्या परीक्षेत यंदा अनेक गैरप्रकार घडल्याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेपरफुटीसह विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याच्या मुद्द्यावर अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे केंद्र सरकार व राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने १३ जून रोजी १५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांची २३ जूनला फेरपरीक्षा घेण्यात येऊन त्याचा निकाल ३० जूनला जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय निर्णय होणार, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

ग्रेस मार्क रद्दमुळे फार परिणाम नाही

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक डॉ. परवेज नाईकवाडे यांनी सांगितले, ‘नीट’ची फेरपरीक्षा सध्यातरी १५६३ विद्यार्थ्यांचीच होणार आहे. त्यामुळे ऑल इंडिया रँकमध्ये फारसा फरक पडणार नाही. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या ऑल इंडिया कोट्यासाठीचा कटऑफ गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त राहणार, हे नक्की आहे.

महाराष्ट्रातील कॅटेगिरी रँक महत्त्वाची

महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रवेशासाठी विद्यार्थी अर्ज करतील तेव्हा सीईटी-सेलमार्फत या सर्व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. स्टेट मेरीट लिस्टमधील विद्यार्थ्याचा क्रमांक महाराष्ट्रातील प्रवेशासाठी महत्त्वाचा आहे. एनटीबी, एनटीसी, एनटीडी तसेच विमुक्त जाती-अ हे प्रवर्ग राष्ट्रीय स्तरावर इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात येत असले तरी महाराष्ट्रात या प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांची कॅटेगिरी रँकदेखील महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवेशाचा रस्ता या गोष्टींवर अवलंबून

यावर्षी राज्यात किती नवीन महाविद्यालये सुरू होतात आणि किती जागा वाढतात तसेच ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रातील किती विद्यार्थी प्रवेश घेतात, किती विद्यार्थी रिपीट करतात, या सर्व बाबींवरूनच महाराष्ट्राचा कटऑफ निश्चित होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता न करता प्रवेश फेरीत सहभागी होणे आवश्यक आहे, असे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.

ऑल इंडिया रँकमध्ये असा पडला फरक

गुण -२०२३ -२०२४ -फरक
७२० - २  - ६७ - ६५
६९० - ९०१ -४८४२ - ३९४१
६६० - ४८५४ - २१०६७ - १६२१३
६३० - १४१८४ - ४८७२२ - ३४५३८
६१८ - १९४६९ - ६०५०० - ४१०३१
५८५ - ३८६१८ - ९८१२७ - ५९५०९
५२० - ९०२१० - १८०९१२ - ९०७०२
४०५ - २२३९९४ - ३६९६१४ - १४५६२०

Web Title: Medical admission Mathematics depends on rank in Maharashtra, category ranking is also important 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.