वैद्यकीय महाविद्यालयांतील १७ पदे होणार नियमित
By admin | Published: June 8, 2017 06:32 AM2017-06-08T06:32:43+5:302017-06-08T06:32:43+5:30
तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत १७ पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागात तसेच शासकीय दंत महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सक या संवर्गामध्ये तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत १७ पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सेवा नियमित करण्यात आलेल्या पदांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गातील ८ तर दंतशल्यचिकित्सक संवर्गातील ९ उमेदवारांचा समावेश आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतील एक विशेष बाब म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय निवड मंडळामार्फत तात्पुरत्या सेवेने नियुक्त झालेल्या या उमेदवारांना यापूर्वी केलेल्या तात्पुरत्या सेवेचे कोणतेही आर्थिक लाभ मिळणार नाहीत; तसेच शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून त्यांच्या सेवा नियमित होणार आहेत.
राज्यात सध्या १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि ३ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. शासकीय दंत महाविद्यालये व वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अध्यापकांच्या पदांचे प्रमाण निश्चित करण्यात येते. खासगी वैद्यकीय व्यवसाय आणि खासगी रुग्णालयांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेली स्पर्धा पाहता या दंतमहाविद्यालयांसमोर अनुभवी, निष्णात डॉक्टरांची अध्यापन आणि रुग्णसेवेसाठी कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.