वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढणार
By admin | Published: September 29, 2016 02:44 AM2016-09-29T02:44:17+5:302016-09-29T02:44:17+5:30
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
या वाढीव जागांसाठी अतिरिक्त वित्तीय तरतूद करण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये १ महासंचालक, ८ उपसंचालक आणि नेत्र संचालक अशी पदे निर्माण करण्याबाबत मंत्री महाजन यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यसमवेत बैठक घेतली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्र. वाकोडे, आयुर्वेदचे सहसंचालक वै. श्रद्धा सुडे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव राजेंद्र सावंत, जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना कालबद्ध पदोन्नती/वेतनश्रेणी लागू करणे, ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयामधील अध्यापकांना दुपटीने व्यवसायरोध भत्ता देणे व नियमित व करार पद्धतीने नेमण्यात आलेल्या अध्यापकांना देण्यात येणारा मोबदला वाढवून देणे आदी प्रस्तावांवर चर्चा झाली. टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ४ विभागात कॅन्सर रुग्णालय सुरू करणे, सर ज. जी. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकरिता येत्या ३ वर्षांत ६५० कोटी निधी उपलब्ध करणे, शासकीय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करण्यासोबत सुपर स्पेशालिटी विभाग सुरू करणे, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा विभाग शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून सुरू करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. (प्रतिनिधी)