वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापक, विद्यार्थी वाढणार
By admin | Published: May 16, 2017 02:28 AM2017-05-16T02:28:07+5:302017-05-16T02:28:07+5:30
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढविण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून, त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे.
रुग्ण आणि डॉक्टरांच्या हिताबरोबरच डॉक्टरांच्या सेवा व कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. या अदेशाची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून आपण पाठपुरावा करीत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे निर्माण करताना, संबंधित महाविद्यालयांतील फक्त विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते.
ही विद्यार्थी संख्या ठरविताना संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक रुग्णखाटांचे किमान प्रमाण भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिले आहे.
तथापि, राज्यात बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्णखाटांपेक्षा कितीतरी जास्त खाटा उपलब्ध असून, त्या सर्व रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. अतिरिक्त रुग्णखाटांची सेवा करताना डॉक्टरांवर, वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही ताण येतो. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा टिकविण्यासाठी
व डॉक्टरांवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले आहेत.