यवतमाळमधील 'त्या' घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; सखोल चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 01:56 PM2021-11-11T13:56:04+5:302021-11-11T13:56:52+5:30
Amit Deshmukh: या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशा भावनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : काल रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशा भावनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.