वैद्यकीय शिक्षणप्रक्रिया सुलभ व्हावी
By admin | Published: June 27, 2016 01:01 AM2016-06-27T01:01:12+5:302016-06-27T01:01:12+5:30
शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली
पुणे : वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली आहे. ही प्रक्रिया सुलभ आणि कायम करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले.
फेडरेशन आॅफ आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजिकल सोसायटीज आॅफ इंडिया (एफओजीएसआय) आणि इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ गायनालॉजिकल अँड आॅब्स्टेट्रीक (एफआयजीओ)च्या परिषदेत चव्हाण बोलत होते. बेस्ट प्रॅक्टिसेस,
ब्रेकथ्रूज अँड करंट डिलेमाज इन आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजी हा परिषदेचा विषय आहे.
‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, सिम्बायोसिस विश्व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. याबरोबरच फिगोचे अध्यक्ष सी. एन. पुरंदरे आणि फॉग्सीच्या अध्यक्ष डॉ. अलका कृपलानी, फॉग्सीच्या उपाध्यक्ष आणि परिषदेच्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे-पाटील आणि पीओजीएसचे अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी, डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. हेमा दिवाकर, डॉ. महेश गुप्ता, पंकज सरोदे व डॉ. शांताकुमारी व अभिनेत्री ईशा कोप्पीकर उपस्थित होते.
‘‘आजही आपल्या समाजातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणारे नागरिक आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना योग्य त्या सेवा मिळायला हव्यात,’’ असे दर्डा यांनी सांगितले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम माध्यमांनी करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एमक्यूआर फार्मास्युटिकलचे सतीश मेहता यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. चारुचंद्र जोशी यांनी प्रास्ताविक तर डॉ. भारती ढोरे-पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
>नैतिकता योग्य पद्धतीने जपली जावी : विजय दर्डा
माध्यमांची वैद्यकीय जनजागृतीमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करताना खासदार विजय दर्डा म्हणाले, ‘‘माध्यमांमध्ये मोठी ताकद असून, तिचा योग्य पद्धतीने वापर होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत असताना वैद्यकीय क्षेत्रात असणारी नैतिकता योग्य पद्धतीने जपली जाणे महत्त्वाचे आहे. व्यवसाय म्हणून वैद्यकीय पेशाकडे पाहणारा वर्ग तसेच गुन्हेगार म्हणून डॉक्टरांची निर्माण होणारी ओळख ही खेदाची बाब आहे. काही वेळा गरज नसतानाही डॉक्टरांकडून काही तपासण्या करण्यास सांगितले जाते. तसेच अत्यवस्थ रुग्णाला काही दिवस विनाकारण रुग्णालयात ठेवले जाते. या गोष्टी चुकीच्या आहेत.’’
जगातील सर्वात मोठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा भारतात असून, अत्यंत तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर भारतात तयार होतात. पूर्वी भारतात असलेली फॅमिली डॉक्टर ही अतिशय उत्तम संकल्पना होती. मात्र, आता ही संकल्पना लोप पावत चालली आहे. सध्या कोणत्याही आजारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे, हे तितके योग्य नाही.
- डॉ. शां. ब. मुजुमदार