वैद्यकीय उपकरणांची निर्मिती देशातच व्हावी
By admin | Published: May 26, 2017 03:51 AM2017-05-26T03:51:46+5:302017-05-26T03:51:46+5:30
स्टार्टअप कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणे आपल्याच देशात बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्टार्टअप कंपन्यांनी वैद्यकीय उपकरणे आपल्याच देशात बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आरोग्य सेवा गरिबांना परवडतील इतक्या स्वस्त करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
टाटा मेमोरिअल सेंटरच्या सेवा कार्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला. त्या वेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी १0 लाख लोकांना कर्करोग होतो. ६.५ लाख लोक या आजाराने मृत्यू पावतात. ३0 वर्षांत हा आकडा दुप्पट होईल, अशी भीती आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने व्यक्त केली आहे.
मोदी म्हणाले की, रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी ७0 टक्के उपकरणे विदेशातून आयात करण्यात येतात. त्यामुळे उपचाराचा खर्च वाढतो. ही परिस्थिती बदलायला हवी. वैद्यकीय उपकरणे भारतातच कशी बनवता येऊ शकतील यावर संशोधन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन मी स्टार्टअप उद्योगास करतो. तब्बल १५ वर्षांनंतर नवे राष्ट्रीय आरोग्य धोरण आम्ही घेऊन आलो आहोत. आरोग्य व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे. २0१४ मध्ये माझे सरकार सत्तेवर आले तेव्हा कॅन्सर ग्रीडला केवळ ३६ कर्करोग रुग्णालये जोडलेली होती. गेल्या तीन वर्षांत हा आकडा १0८ वर गेला आहे. टाटा मेमोरिअल सेंटरच्या मदतीने वाराणसी, चंदिगढ, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी येथे चार कर्करोग संशोधन संस्था उभ्या केल्या जात आहेत, असेही मोदींनी सांगितले.