राज्यातील वैद्यकीय परीक्षांचा निर्णय आठवड्याभरात अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:12 PM2020-05-13T19:12:53+5:302020-05-13T19:21:34+5:30
पुढील आठवड्यात किंवा मे अखेरपर्यंत परीक्षा बाबतचा निर्णय विद्यार्थ्यांना कळविला जाईल.
पुणे: राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून या परीक्षा संदर्भातील निर्णयाबाबत केंद्रीय परिषदांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुढील आठ ते दहा दिवसात त्यावर मार्गदर्शक सूचना येणे अपेक्षित आहे, असे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.मोहन खामगावकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठ अपवाद नाही. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे पुढील वेळापत्रक राज्य शासन, संस्था प्रमुख ,प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून ठरविले जाणार आहे. तसेच केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून वेळापत्रक निश्चित केले जाणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.
डॉ.मोहन खामगावकर म्हणाले,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्य विभागाला विविध पातळ्यांवर मदत करत आहेत. तसेच सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नाही. त्याचप्रमाणे परिक्षांसंदभार्तील निर्णय घेण्याचे अधिकार केंद्रीय परिषदांना आहेत. त्यामुळे विद्यापीठातर्फे केंद्रीय परिषदांची संवाद साधला जात असून परीक्षांबाबत शिथीलता देणे शक्य आहे का? यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. केंद्रीय परिषदांकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातर्फे परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल.
---------------
विद्यापीठातर्फे डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आले असून केंद्रीय परिषदांकडे परीक्षा संदर्भातील संवाद सुरू आहे. पुढील आठवड्यात किंवा मे अखेरपर्यंत परीक्षा बाबतचा निर्णय विद्यार्थ्यांना कळविला जाईल.
- डॉ दिलीप म्हैसेकर,कुलगुरू आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक