शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय चाचण्यांची सोय

By admin | Published: May 13, 2017 02:37 AM2017-05-13T02:37:06+5:302017-05-13T02:37:17+5:30

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करुन घेण्यासाठी आता सहजपणे

Medical facilities in government hospitals | शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय चाचण्यांची सोय

शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय चाचण्यांची सोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुने चाचण्या करुन घेण्यासाठी आता सहजपणे वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅबोरेटरी) सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या कंपनीसमवेत महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा उपक्रम कार्यान्वित केला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्थ संस्थेमार्फत वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा (लॅबोरेटरी सर्व्हिसेस) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेद्वारा प्रयत्न करण्यात येत होते. मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड यांच्यासोबत ५ वर्षांसाठी करार करण्यात आल्याने या प्रयत्नांना यश आले आहे. करारानुसार मेसर्स एचएलएल लाइफकेअर ही कंपनी राज्यात विविध ठिकाणी लॅब स्थापन करणार आहे. लॅबला संलग्न शासकीय रुग्णालये व संस्थांमधून नमुने संकलन करून लॅबमध्ये आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क शासनाकडून दिले जाणार असून, त्यामुळे रुग्णांना ही सेवा विनामूल्य मिळणार आहे.
आतापर्यंत पुणे, ठाणे, नंदुरबार, जालना, बीड, रायगड, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, रत्नागिरी, धुळे, गोंदिया, जळगाव, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग या १६ जिल्ह्यांमधील काही शासकीय रुग्णालयांत ही सेवा उपलब्ध झाली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर आरोग्य संस्थांमध्ये त्याचा विस्तार होणार आहे.
मेसर्स एचएलएल लाइफकेअर लिमिटेड यांचे कर्मचारी शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांचे वैद्यकीय नमुने संकलन करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळेत हजर राहणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत, ग्रामीण रुग्णालये, तसेच ५० खाटांपेक्षा कमी क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत; १०० खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यामध्ये सकाळी ८ ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ४ ते ६.३० पर्यंत नमुने संकलन करण्यात येईल. अतिदक्षता व वैद्यकीय आपत्कालीन स्थितीवेळी ‘बोलावताच हजर’ या तत्त्वानुसार २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अहवालही मिळणार-
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २५ प्रकारच्या, ग्रामीण रुग्णालये, तसेच ५० खाट क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ३२ प्रकारच्या चाचण्या करणे शक्य होणार आहे.
१०० खाटांपेक्षा जास्त क्षमतेची उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये, मनोरुग्णालये आणि प्रादेशिक संदर्भसेवा रुग्णालये यामध्ये सुमारे ५२ प्रकारच्या चाचण्या करण्यात येतात आणि त्यांचे अहवालही दिले जातील.

Web Title: Medical facilities in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.