जळगावमध्ये मेडिकल हब
By Admin | Published: April 26, 2017 01:42 AM2017-04-26T01:42:24+5:302017-04-26T01:42:24+5:30
जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (हब) उभे करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
मुंबई : जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (हब) उभे करण्यात येणार असून, त्यासाठी १ हजार २५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जळगाव-जामनेर मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे भव्य संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्यात येईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाबाबतची माहिती पत्र परिषदेत दिली. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय यांचा समावेश आहे. शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारणीसाठी ४६.५६ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा रुग्णालयासह एकूण १२ एकर जागा सदर वैद्यकीय संकुल स्थलांतरित होईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यासदेखील मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)