वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश: मराठा आरक्षण विधेयक मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:41 AM2019-06-21T02:41:00+5:302019-06-21T02:41:15+5:30
विधानसभेत एकमताने शिक्कामोर्तब
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात चालू शैक्षणिक वषार्पासूनच मराठा आरक्षण लागू करण्यासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले.
राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू केला. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक संस्था आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण लागूही करण्यात आले. मात्र पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी २ नोव्हेंबर रोजी हे आरक्षण लागू केल्याचा दावा करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले होते.
अध्यादेश काढण्यामागील पार्श्वभूमी
उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही निकाल विरोधात गेला. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांचे प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता. आरक्षणाचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला होता.