ईडीने दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत - भुजबळ
By Admin | Published: June 14, 2016 06:12 PM2016-06-14T18:12:27+5:302016-06-14T20:15:31+5:30
सक्तवसुली संचालनालयनं दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत, त्यांच्या माहितीत विसंगती आहेत. असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ : सक्तवसुली संचालनालयानं दिलेले मेडिकल रिपोर्ट माझे नाहीत, त्यांच्या माहितीत विसंगती आहेत, असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयात केला आहे. त्यांच्या जामिनावर हायकोर्टात आज सुनावणी झाली. ईडी छगन भुजबळांच्या या आरोपांचे उत्तर शुक्रवारी देणार आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सरकारमधील त्यांच्या ताकदीच्या जोरावर २०३.२४ कोटी रुपये कमावले असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा ही रक्कम ७,१५२.५० टक्के अधिक आहे. हे सर्व पैसे त्यांनी स्वत:चे नियंत्रण असलेल्या कंपन्यांत शेअरच्या माध्यमातून गुंतविले, असा दावा एसीबीनं केला आहे.
या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह त्यांची पत्नी मीना, मुलगा पंकज, पुतण्या समीर, सून विशाखा, चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक, हवाला ऑपरेटर सुरेश जजोदिया, प्रवीण जैन, संजीव जैन, चार्टर्ड अकाउंटंट चंद्रशेखर सारडा आणि कपिल पुरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम १३ (१) ई आणि १३ (२)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.