मेडिकलच्या जागा आणखी वाढणार
By Admin | Published: June 27, 2015 02:16 AM2015-06-27T02:16:57+5:302015-06-27T02:16:57+5:30
सध्या महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील सर्वाधिक म्हणजे १७२० जागा आहेत. भविष्यात या जागा अजून वाढतील,
मुंबई : सध्या महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी देशातील सर्वाधिक म्हणजे १७२० जागा आहेत. भविष्यात या जागा अजून वाढतील, अशी योजना शासनाने आखली आहे. यासंदर्भात मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्याणी यांच्यामार्फत राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.
वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रात प्राध्यापक कमी असल्याने भारतीय वैद्यकीय परिषद येथील मेडिकलच्या जागा वाढवत नसल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने हा मुद्दा सुओमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला. याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने शासनाला दिले होते.
त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी शासनाने काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी प्राध्यापक, उपप्राध्यापक व लेक्चरर यांची बदली दुसऱ्या विभागात होणार नाही. याचा अर्थ कोकणातील वैद्यकीय प्राध्यापकाला तेथेच बढती मिळेल व तेथेच तो सेवानिवृत्त होईल. तसेच आधी या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरल्या जात होत्या. मात्र आता या जागा स्वतंत्र मंडळाकडून भरल्या जाणार आहेत. कंत्राटीपद्धतीनेही काही प्राध्यापक व लेक्चरर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)