‘नीट’मुळे मेडिकलच्या जागा रिक्त राहणार
By admin | Published: May 16, 2016 01:55 AM2016-05-16T01:55:33+5:302016-05-16T01:55:33+5:30
(नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.
पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेत ७२० गुणांपैकी ३६० गुणांपेक्षा अधिक मिळविणारे उमेदवारच मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. दोन महिन्यांत नीट परीक्षेचा अभ्यास करून राज्यातील विद्यार्थ्यांना ३६० गुण मिळणे अवघड जाईल. परिणामी, राज्यातील मेडिकल प्रवेशाच्या जागा रिक्त राहतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील विद्यार्थी हुशार असल्याने प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
केंद्रीय मध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ७२० गुणांपैकी ३६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवतील. मात्र, राज्य मंडळाच्या केवळ बारावीच्या अभ्यासक्रमाच्या आधारे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत अभ्यास करून ३६० गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घ्यावे लागतील. तेव्हाच राज्यात मेडिकल प्रवेशाच्या एकूण ६ हजार ५०० जागा भरल्या जातील. सीबीएसईतर्फे २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या नीट परीक्षेला राज्यातून १ लाख ३४ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९६ हजार ५४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे २०१३ च्या नीट परीक्षेत ७२० गुणांपैकी ९८ गुण मिळवून मेडिकल प्रवेशासाठी ३३ हजार ९६४ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र, यंदा मेडिकल सीईटी परीक्षेसाठी राज्यातील सुमारे २ लाख ८० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून त्यांनी राज्य मंडळाचा केवळ बारावीचा अभ्यास केला आहे. आता त्यांना सीबीएससी बोर्डाचा अकरावी आणि बारावी या दोनही वर्षाचा अभ्यासक्रम दोन महिन्यात पूर्ण करायचा आहे. त्यातच ७२० पैकी ३६० गुण मिळवायचे आहेत. राज्यातील विद्यार्थी एवढे गुण मिळवू शकतील का? याबाबत शंका व्यक्त होत आहे.
>२०१३ च्या ‘नीट’साठी जून २०१२ मध्येच कोणता अभ्यास करावा, हे स्पष्ट केले होते. आता २ महिन्यांतच अभ्यास करावा लागेल. यंदा उत्तीर्ण होण्यासाठी ५० % गुण लागतील. २०१३ मध्ये १३ % गुण मिळवावे लागले होते. त्यामुळे राज्यातील जागा रिक्त राहू शकतात.
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र
>विद्यार्थी ७२० पैकी ३६० गुण मिळवतील, याबाबत शंका नाही. कमी गुण मिळाल्यास गरज भासल्यास ५ ते १० गुणांनी कट आॅफ खाली घेता येऊ शकतो. मात्र, २०१३ च्या नीट परीक्षेचा अनुभव विचारात घेता कट आॅफ खाली घेण्याची वेळ येणार नाही.
-प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय