वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरण चिंताजनक
By admin | Published: June 6, 2016 12:44 AM2016-06-06T00:44:56+5:302016-06-06T00:44:56+5:30
हृदयाचे ठोके काहीसे कमी झाले होते... त्यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला... आणि बायपास करण्याचे ठरले... आॅपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अचानक डॉक्टरांनी अहो तुमचे ठोके आता
पुणे : हृदयाचे ठोके काहीसे कमी झाले होते... त्यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला... आणि बायपास करण्याचे ठरले... आॅपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अचानक डॉक्टरांनी अहो तुमचे ठोके आता व्यवस्थित नॉर्मल पडत आहेत, त्यामुळे आता ‘बायपास’ करण्याची गरज नाही, असे सांगून मला थिएटरच्या बाहेर आणले... एखादा सामान्य रुग्ण नव्हे, तर स्वत: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपला हा अनुभव कथन करीत होते आणि तोही या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्यासमोर. आपल्या या अनुभवाच्या कडू डोसाद्वारे साहेबांनी, देशामधील वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरणाची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगून या व्यवसायाच्या वस्तुस्थितीवर बोट ठेवले.
हर्डीकर हॉस्पिटल आणि ससून रुग्णालय यांच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शरद हर्डीकर यांच्या ‘स्पाईन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. भूषण पटवर्धन, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि मदन हर्डीकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘आज वैद्यकीय क्षेत्रात ‘स्पेशलाईज’ डॉक्टरांची संख्या दिवसागणिक वाढत असून, ‘फॅमिली डॉक्टर’ची संकल्पना जवळपास हद्दपार झाली आहे.
एक काळ असा होता, की फॅमिली डॉक्टरकडे गेले, की रुग्णाला बरे वाटायचे. आरोग्याबरोबरच इतर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, याबाबत ते मार्गदर्शन करायचे आणि अर्धा आजार पळून जायचा. मात्र स्पेशलायझेशनच्या काळात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुसून गेली. आज हृदय, कर्करोग अशा विविध विभागांतील अनुभवी डॉक्टरांची फळी तयार झाली आहे.
डॉ. शरद हर्डीकर यांनी शिकविणे हा एक नोबेल व्यवसाय आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण हा एक ज्ञानयज्ञ असून, शिक्षक ज्ञानाची आहुती यज्ञात देत असतात, असे सांगून गुरू-शिष्य नात्यावर प्रकाश टाकला.