वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैला होणार: अमित देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 02:53 PM2020-06-05T14:53:38+5:302020-06-05T14:54:59+5:30
लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल..
पुणे : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षेसाठी विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. लवकरच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. येत्या १५ जुलै पासून वैद्यकीय विभागाच्या परीक्षा सुरु होतील. ही माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आज पुण्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधला असता त्यांनी अनेक विषयावर भाष्य देखील केले.
देशमुख म्हणाले, वैद्यकीय विभागाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत तिथेच परीक्षा घेण्यात येथील असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवास करण्याची आवश्यकता भासणार नाही.
पुढे ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष वेळेनुसारच सुरू करण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार आहे. तसेच राज्यातील अनेक भागात डॉक्टर, नर्स हे युद्ध पातळीवर काम करत आहे. त्या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, नर्स किंवा जी काही पदे रिक्त असतील. ती भरण्यासाठी मंजूर देण्यात आली असून त्या संदर्भातील कार्यवाहीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात एका बाजूला करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत बरे होऊन घरी जाणार्याची संख्या देखील अधिक प्रमाणात आहे. हे पाहून समाधान वाटते आहे. मात्र त्यामध्ये मृत्यू दर कशा प्रकारे कमी करता येईल, याकडे सरकारचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------
मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील खासगी लॅबचे दर निम्म्यावर आणणार
पुण्यात करोना टेस्ट करण्यासाठी साडे चार हजाराहून अधिक दर खासगी लॅब आकारतात. त्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्य सरकारने मुंबईत दोन हजार रुपये दर आकारण्याचा निर्णय घेतला. आता त्याच धर्तीवर पुण्यात देखील निम्म्यावर दर आकारले जातील, असा निर्णय सरकार घेईल. अशी माहिती देशमुख यांनी दिली. दिली.