वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘आपली चिकित्सा’

By admin | Published: April 4, 2017 03:00 AM2017-04-04T03:00:31+5:302017-04-04T03:00:31+5:30

सर्वसामान्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीने विविध तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत

'Medical Treatment' for Medical Tests | वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘आपली चिकित्सा’

वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘आपली चिकित्सा’

Next

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सर्वसामान्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीने विविध तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘आपली चिकित्सा’ ही गोरगरिबांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरू शकेल, अशी सुविधा प्रस्तावित करण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत महापालिकेची उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांच्या येणाऱ्या रुग्णांना आवश्यकतेनुसार कराव्या लागणाऱ्या विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. याकरिता अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये एकूण १६.१५ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी संबंधित संस्थेला महापालिकेच्या छोट्या रुग्णालयात, दवाखान्यात, प्रसूतिगृहात येऊन नमुना घेणे आवश्यक असणार आहे. ज्यामुळे रुग्णांचा मोठ्या रुग्णालयात जाण्याचा त्रास कमी होऊन वेळही वाचणार आहे. यानुसार १६ उपनगरीय रुग्णालये (छोटी रुग्णालये), ५ विशेष रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे आणि १७५ दवाखाने अशा प्रकारे साधारणपणे २२४ ठिकाणी वैद्यकीय चाचणीसाठी नमुना संकलन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
अनेक वेळा गोरगरीब रुग्णांना केवळ वैद्यकीय चाचणीसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये यावे लागते. ज्यामुळे या रुग्णांना प्रवासाचा त्रास होण्यासोबतच मोठ्या रुग्णालयांवरचा ताणदेखील वाढतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेची उपनगरीय रुग्णालये (छोटी रुग्णालये), विशेष रुग्णालये, प्रसूतिगृहे व दवाखाने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्याचे महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. याअंतर्गत निविदा प्रक्रियेअंती निवड होणाऱ्या संस्थेला महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येऊन चाचणी नमुना घेऊन जाणे बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर न जाताही वैद्यकीय चाचणी सेवा उपलब्ध होणार आहे.
त्याचबरोबर ‘आपली चिकित्सा’ अंतर्गत रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल वेळेत आणि सुलभपणे मिळावा, यासाठी ई-मेल किंवा एसएमएसद्वारे वैद्यकीय अहवाल महापालिकेच्या संबंधित डॉक्टरांना मिळू शकेल, अशीही तरतूद असणार आहे. (प्रतिनिधी)
खासगी प्रयोगशाळांची मदत
पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा ओघ लक्षात घेता महापालिकेच्या इतर छोट्या रुग्णालयातून वा दवाखान्यातून वैद्यकीय चाचणीसाठी येणाऱ्या रुग्णांना चाचणी अहवाल मिळण्यास अधिक कालावधी लागू शकतो.
या सर्व बाबी लक्षात घेऊन वैद्यकीय चाचण्यांबाबत खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य खाते, उपनगरीय रुग्णालयांचे व्यवस्थापन करणारे माध्यमिक आरोग्य सेवा खाते आणि मध्यवर्ती खरेदी खाते यांनी संयुक्तपणे ‘आपली चिकित्सा’ या सुविधा कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली आहे.
८ ते १० तासांत वैद्यकीय अहवाल
वैद्यकीय चाचणी अहवलाच्या प्रकारानुसार सदर अहवाल किती वेळेत महापालिकेच्या संबंधित रुग्णालयाकडे द्यायचा याचा अंदाजित कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निवड होणाऱ्या संस्थेला हा अहवाल निर्धारित वेळेतच महापालिकेकडे देणे बंधनकारक असणार आहे.
आकस्मिक स्वरूपाच्या उपचारांसाठी दाखल असणाऱ्या रुग्णांबाबत तातडीचा वैद्यकीय चाचणी अहवाल ३ तासांमध्ये देणे आवश्यक असणार आहे. तर इतर रुग्णांच्या बाबतीत हे अहवाल ८ ते १० तासांमध्ये देणे आवश्यक असणार आहे.
>अतिरिक्त शुल्क नाही
विशेष म्हणजे या रुग्णांना खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तर महापालिकेच्या निर्धारित शुल्कदरातच ही सुविधा रुग्णांना उपलब्ध होणार आहे. निविदा प्रक्रियेनुसार निवड होणाऱ्या प्रयोगशाळेला ७७ प्राथमिक स्वरूपाच्या, तर ६३ जटिल स्वरूपाच्या चाचण्या; यानुसार एकूण १४० प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या करणे बंधनकारक असणार आहे.
>...तर दंडात्मक कारवाई
वैद्यकीय चाचणी अहवाल हा निर्धारित केलेल्या कालावधीपेक्षा उशिराने देण्यात आल्यास, यासाठी दंडात्मक तरतूद म्हणून महापालिकेद्वारे संबंधित संस्थेला देण्यात येणारी रक्कम न देण्याची तरतूददेखील कंत्राटामध्ये असणार आहे. निवड झालेल्या संस्थेद्वारे चुकीचा वैद्यकीय चाचणी अहवाल देण्यात आल्यास त्यावर दंडात्मक कारवाईची तरतूददेखील आहे. तसेच अशी बाब वारंवार घडल्यास कंत्राट रद्द करण्याची तरतूददेखील असणार आहे.

Web Title: 'Medical Treatment' for Medical Tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.