वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी औषधवारी सज्ज; त्वचेच्या रोगावरील औषधांमध्ये यंदा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 07:47 AM2024-07-01T07:47:36+5:302024-07-01T07:48:44+5:30
या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते
ठाणे : ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ असे म्हणत लाखो वारकरी वारीसाठी पायी जातात. विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी ठाणे शहरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही औषधवारी निघणार आहे. दमटपणामुळे खाजेचे प्रमाण वाढणे, त्वचेचा संसर्ग होणे यासारख्या आजारांवरील औषधांत यंदा वाढ केली असल्याचे या औषधवारीचे संयोजक डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ९ ते १५ जुलै या कालावधीत वारीच्या मार्गावर वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने या औषधवारीचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या काेनाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते. यंदाचे हे ४२ वे वर्षे आहे. सुरुवातीला या वारीत पाचजणांची टीम होती. आता ती २५ जणांवर पोहोचली आहे. या औषधवारीच्या निमित्ताने एप्रिल महिन्यापासून औषधांचे वर्गीकरण ज्ञानदेव सेवा मंडळाच्या सभागृहात दर रविवारी केले जाते.
या वारीत दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा औषधांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. डॉ. शुक्ल यांनी सांगितले की, यावर्षी २०० सलाईनच्या बाटल्या, १००० मलम, सध्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे त्यांना त्वचेचा संसर्ग होत असतो तो अनुभव पाहता १,५०० खाजेच्या ट्यूब जादा घेतलेल्या आहेत. या वारकऱ्यांना सेवा देत असताना जीवन सफल झाल्यासारखे वाटते, असे ते म्हणाले.
औषधवारीचा मार्ग खालीलप्रमाणे
९ जुलै फलटण, १० जुलै वाजेगांव,
११ जुलै नातेपुते, १२ जुलै माळशिरज,
१३ जुलै वेळापूर, १४ जुलै वाडी कुरोळी,
१५ जुलै गादेगांव.
ही टीम झाली सज्ज
डॉ. शुक्ल यांच्यासह डॉ. दिनकर गोड, डॉ. राजा इसरानी, डॉ. विश्वास खोडकर, डॉ. अजित गौड, डॉ. सुनील प्रजापती, डॉ. अजय तिवारी, उज्ज्वला पवार, अनिता काप, सुनील म्हात्रे, अविनाश मोहिते, गिरीश कुलकर्णी, विठ्ठल सकुंडे, निखिल चौधरी, शिवम गौड, ज्ञानेश्वर शिंदे, रेणुका शिंदे, अशोक घोलप, गीतांजली शिर्के, हेमा देशमुख, विद्या शुक्ला, अभय मराठे, स्वरांजली कारेकर, आदी मंडळी वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहेत.