एफडीए पाठवणार नेपाळला औषधे
By admin | Published: May 2, 2015 01:47 AM2015-05-02T01:47:42+5:302015-05-02T01:47:42+5:30
नेपाळमधील भूकंपामध्ये जखमी झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज आहे.
मुंबई : नेपाळमधील भूकंपामध्ये जखमी झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढते आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील ३० औषध कंपन्यांकडून आतापर्यंत विविध आवश्यक औषधांनी भरलेली १,३०९ खोकी एफडीएने गोळा केली आहेत.
नेपाळ येथे झालेल्या भूकंपामुळे १५ हजारांहून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तिथल्या पायाभूत सुविधाही जमीनदोस्त झाल्याने औषधांची कमतरता भासत आहे. त्यामुळे एफडीएने औषध कंपन्यांना औषधे देण्याचे आवाहन केले होते. राज्यातील ३० औषध कंपन्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. बॅण्डेज, सर्जिकल हॅण्डग्लोव्ह्ज, वेदनाशामक औषधे, प्रतिजैविके, अॅण्टीडायरियाची औषधे, टिटॅनस टाक्साइडची इंजेक्शन्स, निर्जंतुकीकरणाची औषधे, इतर आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाणारी औषधे मागवण्यात आलेली आहेत. पण अजूनही ही औषधे पाठवण्यात आलेली नाहीत. कारण तिथे मोठ्या प्रमाणात मदत पोहोचली तरी तिथे सध्या साठा करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. औषधे पाठविण्यास काठमांडू येथून संमती मिळाल्यावर ही औषधे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.