राज्य सरकारने ठेवला मेवाणी, खालिदवर ठपका
By अतुल कुलकर्णी | Published: January 5, 2018 04:11 AM2018-01-05T04:11:46+5:302018-01-05T04:14:32+5:30
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.
मुंबई - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसक घटनांना गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद कारणीभूत असल्याचा ठपका राज्य सरकारने ठेवला असून तसा अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे समजते.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात झालेला हिंसाचार आणि बुधवारच्या महाराष्टÑ बंद दरम्यान झालेल्या हिंसक घटनांबाबत राज्य सरकारने गुरुवारी केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल पाठविला आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत आ. जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुमधील विद्यार्थी नेते उमर खालिद यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे राज्यातील वातावरण बिघडले. त्यामुळे आता मेवाणींच्या राज्यातील कार्यक्रमांवर बंदी आणण्यात येत आहे, असे अहवालात नमुद केल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिवाय, वढू (बुद्रुक) येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घटना घडली तेव्हाच स्थानिक पातळीवर पुरेशी काळजी घ्यायला हवी होती; पण ती घेतली गेली नाही. नंतरच्या काळात राज्याबाहेरील व्यक्तींनी येऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका माध्यमाच्या कार्यक्रमात म्हटले होते. तोच संदर्भ गुरुवारी पाठविण्यात आलेल्या अहवालात असून मेवाणी आणि खालिद यांनी काय भाषण केले, त्यांना कोणी बोलावले असे सगळे संदर्भ असल्याचे समजते.