मीरा भाईंदरमधील मांसबंदीचा निर्णय मागे
By admin | Published: September 9, 2015 08:24 PM2015-09-09T20:24:49+5:302015-09-09T20:24:49+5:30
जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर आठ दिवसांची बंदी घालण्याचा मीरा भाईंदरमधील निर्णय आता मागे घेण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई/मीरा भाईंदर, दि. ९ - जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर आठ दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय मीरा भाईंदर महापालिकेने मागे घेतला आहे. प्रशासनाने सत्ताधारी भाजपाचा हा प्रस्ताव धुडकावून लावत फक्त दोन दिवसांसाठी मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आठ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही असा इशाराच दिला आहे.
जैन धर्मीयांच्या पर्युषणा दरम्यान मीरा भाईंदर महापालिका हद्दीत आठ दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा वादग्रस्त निर्णय सत्ताधारी भाजपाने केला होता. मीरा भाईंदरपाठोपाठ नवी मुंबई महापालिकेनेही हा निर्णय घेतला असून मुंबईतही दोन दिवसांसाठी मांसविक्रीवर बंदी टाकण्यात आली आहे. मात्र या निर्णयावरुन भाजपावर टीकेची झोड उठली आहे. मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने सत्ताधारी भाजपाला जोरदार दणका देत ८ ऐवजी फक्त २ दिवस मांसविक्रीवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता मीरा भाईंदरमध्ये १० व १७ सप्टेंबर रोजी मांसविक्रीवर बंदी असेल. मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन यांनी प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आम्हाला अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला असून यासंदर्भात आयुक्तांना जाब विचारु असे गीता जैन यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली आहे. अशी कोणतीही बंदी कोणावर लादता येत नाही व असा प्रयत्न जरी झाला तरी आम्ही ती बंदी स्वीकारणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.