आव्हानांशी सामना करा...
By Admin | Published: August 21, 2016 02:19 AM2016-08-21T02:19:16+5:302016-08-21T02:19:16+5:30
रोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या
- कुणाल गडहिरे
रोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या प्रत्येक उद्योजकाचे आहे. मात्र, बदलत्या काळानुसार मराठी उद्योजकांसमोर नवीन आव्हाने आहेत. नव्याने सुरू होत असलेले स्टार्ट अप्स पारंपरिक उद्योगांना थेट आव्हाने देत आहेत. ज्या प्रकारे उद्योग, व्यवसायामध्ये नवीन पिढी आली आहे, त्याच प्रकारे ग्राहकांचीसुद्धा नवीन पिढी आली आहे. या नव्या पिढीच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोशल मीडिया, आॅनलाइन, डिजिटल मार्केटिंग यांत मराठी उद्योजक मागे असल्याचे दिसत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते भरारी घेत असताना, या नव्या आव्हानांचा सामना करत, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन संकल्पना शिकणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
सन २०१० साली मी पहिल्यांदा बिझनेसमध्ये पडलो, शब्दश: पडलो होतो. माझ्याच सोबतच्या चार मित्रांना घेऊन, मी एक उपद्व्याप सुरू केला होता. अर्थात, नोकरीचा पर्याय होता, पण तो माझ्यासाठी नाही, इतके मनात नक्की होते, पण बिझनेस करायचा म्हणजे, एखादी भन्नाट कल्पना जन्माला घालायची आणि पैसे मिळवण्यासाठी त्यावर काम करायचे इतकेच जुजबी ज्ञान माझ्याकडे होते. त्यातली समीकरण कशी जुळवायची, याच्यात मी नापासच होतो आणि त्याचा परिणामसुद्धा दिसलाच. चार महिन्यांत बिझनेस बंद. तेव्हा एका अनुभवी उद्योजकाला भेटलो होतो. त्यांना सल्ला मागितल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, बिझनेसमध्ये लॉस झाला आहे का? लॉस झाला आहे, सांगितल्यावर त्यांनी विचारले, मग तरीही बिझनेस करणार आहेसच का ? मी ‘हो’ म्हणालो. त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘पहिला धडा तू गिरवला आहेसच, आत्ता फक्त, तो का गिरवावा लागला याचा अभ्यास कर.’
आयुष्यात खऱ्या अर्थाने माझी ‘शिकण्याची’ सुरुवात झाली ती इथून. पुन्हा नव्याने बिझनेस करत होतो. लोकांच्या गाठीभेटी घेत होतो. तेव्हा एकूणच उद्योग वर्तुळात एकच वाक्य कानावर यायचे, ‘मराठी माणूस बिझनेस करूच शकत नाही.’ अर्थात, त्याच्या पुढे मराठी माणसाने बिझनेस करायला पाहिजे वगैरे मोटिव्हेशन मसाला भरपूर भरलेला होता. या थीमखाली महाराष्ट्रात काही संस्था, तेव्हा मराठी उद्योजकांना आपापल्या वर्तुळात एकत्र करत होत्या. सॅटर्डे क्लब आणि मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ या त्यातल्या दोन प्रमुख संघटना. या दोन्ही संस्थानी अनेक उद्योजकांची एक अख्खी पिढी घडवलेली आहे. आज काळानुसार या संस्थांनी त्यांच्या उपक्रमात बदल केले आहेत. अशा अनेक संस्थांमध्ये आपल्यासारखे आपल्याच पिढीतले आणखी उद्योजक आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन एकमेकांना मदत करत आहेत, हे चित्र प्रेरणा देणारे होते. या संस्थांच्या माध्यमातून हजारो मराठी उद्योजकांचे एक उत्तम नेटवर्क तयार होत होते.
मराठी उद्योजकांना उद्योगासाठी आवश्यक असणारे तंत्र, मंत्र, प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्था या काळात सुरू झाल्या होत्या. त्यांत समीर सुर्वे, अतुल राजोळी, बासू माळी, स्नेहल कांबळे यांच्यासारखे प्रशिक्षक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमातून निव्वळ प्रेरणा देणाऱ्या गोष्टींपलीकडे जाऊन नेमके काय करायला पाहिजे हे समजावून सांगत होते. त्याच वेळी पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, निर्माण ग्रुपचे अजित मराठे, शरद तांदळे, डिक्कीचे मिलिंद कांबळे यांसारख्या अनेक उद्योजकांनी अनेक मराठी उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये भक्कम पाठिंब्याने उभे केले. आता एका दशकानंतर स्वत:च्या उद्योगात स्थिरावत असतानाच, अर्थसंकेतचे अमित बागवे, साताऱ्याच्या युवा अभियान संस्थेचे मिलिंद कुचेकर, उद्योग मैत्रीणच्या सारिका भोईटे-पवार, नीलेश मोरे, उद्योजक मासिकाचे शैलेश राजपूत, चावडी पोर्टलचे प्राची आणि अमित मखरे हे उद्योजक, नवउद्योजकांना मदत करत आहेत.
गेल्या पाच वर्षांमध्ये मराठी उद्योजकांसाठी अनेक चांगले उपक्रम आयोजित झाले आहेत. सॅटर्डे क्लबचा ‘उद्योगबोध’ आणि निलेश मोरे या वृत्तपत्र विक्रेत्याने सुरु केलेला 'मी उद्योजक होणारचं' हे दोन विशेष कार्यक्रम मराठी उद्योगविश्वात नावाजले आहेत. त्याचसोबत आज महाराष्ट्रात विविध स्थानिक ठिकाणी मराठी उद्योजकांचे बिझनेस क्लब सुरू झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात असे १०० हून जास्त लहान-मोठे बिझनेस क्लब आहेत. मराठी बिझनेस क्लब, मराठी इंटरनॅशनल क्लब, समृद्धी क्लब यासारख्या अनेक बिझनेस क्लबनी त्यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रथितयश नामांकित उद्योजकांशी थेट प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. हे उद्योजक त्यांना आलेल्या समस्यांना कशा प्रकारे सामोरे गेले, हे थेट त्यांच्याकडूनच शिकता येत होते. तसेच उद्योजक मंडळींनी जनसंपर्काच्या माध्यमातून थेट बिझनेस मिळवून द्यावा, अशी यंत्रणा या बिझनेस क्लबनी राबवायला सुरुवात केली. त्याचा फायदा मराठी उद्योजकांना चांगल्या प्रकारे होत आहे.
(लेखक हे स्किल गुरुजी डॉट कॉम या स्टार्ट अपचे संस्थापक आहेत.)