पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 02:12 AM2017-01-20T02:12:57+5:302017-01-20T02:12:57+5:30

महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध वॉर्डमधील प्रभागांमध्ये हालचालींना वेग आला.

Meet the guests, find 'local' | पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना

पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना

Next


मुंबई : महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध वॉर्डमधील प्रभागांमध्ये हालचालींना वेग आला. सहज उपलब्ध असलेला, दांडगा जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करत असताना स्थानिकांचे ‘मत’ देखील विचारत घेतले जात आहे. परिणामी पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना अशी काही अवस्था एल वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १७० मध्ये दिसून येत आहे.
मुंबई शहराप्रमाणे चुनाभट्टीतही पाणी, रस्ता, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुळात आगरी-भंडारी लोकवस्तींचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. परिणामी आम्हाला सहज उपलब्ध असेल आणि आमच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी तत्पर असलेला स्थानिकच आमचा नगरसवेक असेल, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. परिणामी सत्ताधारी पक्ष सोडला तर अन्य राजकीय पक्षांना निवडून येणाऱ्या स्थानिक उमेदवाराची वानवा जाणवत आहे. प्रभाग क्रमांक १७० खुला असल्याने इच्छुकांची गर्दी आहे. त्यातही १७१ मध्ये महिला आरक्षण असल्याने विद्यमान नगरसेवक देखील १७० मधील संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक असल्याचे सुत्रांनी सांगितले. परका उमेदवार देऊन स्थानिकांचा रोष ओढवत मतपेटीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता स्थानिक ‘मिळता गडी मिळेना’ अशी अवस्था अन्य पक्षांची झाली आहे. (प्रतिनिधी)
>इतिहासात डोकावताना
चुनाभट्टी येथे सुमारे ५० वर्षांपूर्वी मुळ आगरी वस्ती होती. पूर्वी येथे चुन्याची भट्टी चालत असे. यामुळे परिसराला ‘चुनाभट्टी’ नाव पडले. भट्टीचा परिसर सध्या नारायण नगर, खजुरीभट्टी म्हणून ओळखला जातो. स्वदेशी मिलमुळे परिसरात बदल झाला. रोजगार उपलब्ध झाल्याने शहरीकरणाला वेग आला.
>अवघ्या १६७ मतांनी विजय
प्रभाग क्रमांक १७० मध्ये विद्यमान नगरसेवक विजय तांडेल अपक्ष म्हणून ५६१४ मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अब्दूल रशिद मलिक यांना ५४४७ मते मिळाल्याने १६७ मताधिक्यांनी तांडेल यांचा विजय झाला होता.
एल वॉर्डाचा नकाशा पाहता दक्षिणेस टोकाला प्रभाग १७०, १७१ आहे. व्ही.एन.पूरव मार्गामुळे चुनाभट्टी दोन प्रभागांत विभागली आहे. प्रभाग क्रमांक १७० मध्ये आगरी, भंडारी लोकवस्ती असून प्रभाग क्रमांक १७१ मध्ये मराठी, मुस्लिम अशी मिश्र स्वरुपाची लोकवस्ती आहे.

Web Title: Meet the guests, find 'local'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.