भगवानगडाच्या पायथ्याशी सभा!

By admin | Published: October 11, 2016 06:21 AM2016-10-11T06:21:47+5:302016-10-11T06:21:47+5:30

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील नियोजित दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारली

Meeting at the base of Godgad! | भगवानगडाच्या पायथ्याशी सभा!

भगवानगडाच्या पायथ्याशी सभा!

Next

अहमदनगर/पाथर्डी : कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील नियोजित दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारली असून, गडाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश सायंकाळी लागू केला आहे. मात्र, गडाच्या पायथ्याशी असलेल्या खरवंडी गावात मेळावा घेण्यास रात्री उशिरा पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी दिल्याने, मुंडे समर्थकांचा जीव भांड्यात पडला.
भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडला आहे. गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावर दसऱ्याला कोणालाही भाषण करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यावर गंडांतर आले आहे. मेळाव्याला परवानगी मागितलेली जागा गडाचे अध्यक्ष नामदेवशास्त्री यांच्या नावावर असून त्यांनी या जागेवर कोणत्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे कळविल्याचे कारण पुढे करत पाथर्डी तहसीलदारांनी परवानगी नाकारली. गडावरील मेळाव्याचा अर्ज निकाली निघाल्यानंतर मुंडे समर्थकांनी मंदिराच्या खाली वनविभागाच्या जागेची परवानगी मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत वनविभागानेही ती नाकारली. औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपाच्या कामगार आघाडीचे हेमंत खेडकर, युवराज पोटे हे नेते दुपारपासून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून होते. तर एक शिष्टमंडळ पाथर्डीच्या प्रांताधिकारी कार्यालयात रात्रीपर्यंत बसून होते. गडाच्या खाली खरवंडी गावात परवानगी द्यावी, असा पर्याय आता समर्थकांनी काढला आहे. प्रशासनाने रात्री उशिरा खरवंडीत मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते रात्रीतून कामाला लागले आहेत. २००९ साली आचारसंहितेच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी येथेच मेळावा घेतला होता.
दरम्यान, भगवानगडावर प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे भाविकांना गडावर जाता येईल. मात्र कुणालाही मेळावा अथवा सभेच्या स्वरूपात एकत्र जमता येणार नाही. तसेच सोबत कोणतेही शस्त्र अथवा काठी नेता येणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting at the base of Godgad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.