उद्धव ठाकरे-शरद पवारांची बैठक; फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, राज्यात वेगवान घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:42 PM2022-03-11T19:42:14+5:302022-03-11T19:42:44+5:30
राज्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू; भेटी आणि बैठकांचं सत्र
मुंबई: राज्याच्या राजकारणात वेगवागन घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी पाहता ठाकरे आणि पवार यांच्या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेट घेऊन निघाले आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला गेले. मविआचे नेते राजभवनातून निघाल्यानंतर थोड्याच वेळात भाजपचे नेते कोश्यारींच्या भेटीला गेले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार राजभवनावर गेले. या भेटीबद्दल विचारलं असता, खासगी निमंत्रण देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचं त्यांनी सांगितलं.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. नवाब मलिकांना ईडीकडून झालेली अटक, केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेली छापेमारी, फडणवीसांनी विधिमंडळात टाकलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवल्यानं त्या पार्श्वभूमीवरही राज्यातील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.