भाजपा प्रदेश कार्यकारिणीची १८, १९ ला पुण्यात बैठक
By admin | Published: June 2, 2016 12:44 AM2016-06-02T00:44:22+5:302016-06-02T00:44:22+5:30
महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या १८ व १९ जून रोजी पुण्यात होत आहे. शिवसेनेबरोबर युती करायची किंवा नाही, याचाही निर्णय यात घेतला जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयाचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर एक किंवा दोन सदस्यांच्या प्रभागांचा उपयोग होणार नाही. बहुसदस्यीय प्रभाग व मतदारांची संख्या जास्त असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल, असा निष्कर्ष खासगी संस्थांच्या सर्वेक्षणात निघाल्यानंतर लगेचच राज्य सरकारने महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग जाहीर केला. त्यानंतर आता पक्षाने या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठीची रणनीती प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीत ठरवण्यात येईल.
शिवसेनेबरोबरचे भाजपाचे संबंध आता मधुर राहिलेले नाहीत. त्यांची राजकीय ताकद कमी करायची एकही संधी सोडायला भाजपा तयार नाही. बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छाही विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच महापालिकेच्या निवडणुकाही स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी आहे. यावर पुण्यातील बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. युती करायची नाही असे ठरले तर त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना सूचना देऊन कार्यरत करण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीशिवाय राज्यातील अन्य काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून त्यासाठीचे ठिकाण वगैरे निश्चित करण्याच्या सूचना पक्षाच्या पुणे शाखेला दिल्या आहेत.