निर्णयाविना पार पडली दोन्ही काँग्रेसची बैठक
By admin | Published: October 16, 2016 01:56 AM2016-10-16T01:56:32+5:302016-10-16T01:56:32+5:30
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी करा व दोघांनाही प्रत्येकी तीन जागा द्या, असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ठेवल्याने शनिवारी
- अतुल कुलकर्णी, मुंबई
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी करा व दोघांनाही प्रत्येकी तीन जागा द्या, असा प्रस्ताव काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे ठेवल्याने शनिवारी कोणताही निर्णय न होताच दोन्ही काँग्रेसची बैठक संपली. विशेष म्हणजे, दोन्ही काँग्रेसने समान जागा लढाव्यात, अशी भूमिका मांडणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या बैठकीचे निमंत्रणच नव्हते.
सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जागा वाटपाची बैठक शनिवारी मुंबईत झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे विरोधीपक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची यावेळी उपस्थिती होती.
सांगली-सातारा (प्रभाकर घार्गे), यवतमाळ (संदीप बाजोरिया), भंडारा-गोंदिया (राजेंद्र जैन), पुणे (अनिल बोरसे) या पाच जागी राष्ट्रवादी विजयी झाली होती तर नांदेड येथे काँग्रेसचे अमर राजूरकर विजयी झाले होते. जळगावला भाजपाचे गुरुमुख जगवानी निवडून आले होते.
बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार यातल्या तीन जागा काँग्रेसला द्या आणि तीन जागा राष्ट्रवादीने घ्याव्यात, अशी भूमिका याआधीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केल्याने त्या भूमिकेवरुन माघार घेणे काँग्रेसला अडचणीचे झाले आहे. सगळ्या जागा राष्ट्रवादीला द्यायच्या असतील तर मग बैठका तरी कशासाठी?, असा सूर पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला होता. त्यामुळे शनिवारच्या बैठकीचे त्यांना निमंत्रणच नव्हते. मात्र याच विषयावर बैठकीत भरपूर चर्चा झाली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जरी पुढे गेलेल्या असल्या तरी त्यावर देखील याच बैठकीत निर्णय घ्या, अशी मागणी तटकरे यांनी लावून धरली. अखेर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या श्रेष्ठींशी चर्चा करून निर्णय घ्यायचा, असे ठरले व ही बैठक संपली. पुन्हा पुढच्या आठवड्यात याचसाठी बैठक घ्यायचे ठरले आहे. काँग्रेसने यवतमाळ आणि सांगली, साताऱ्यासाठी आग्रह धरल्याचे वृत्त आहे.
यासाठी आणखी एक बैठक होईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, आघाडी व्हावी अशी आपली भूमिका आहे, श्रेष्ठींशी बोलून काय ते पुढच्या आठवड्यात ठरवू, असे अशोक चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.