बिल्डर आणि अधिकाऱ्यांची "ती" बैठक सीसीटीव्हीत कैद 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 10:55 PM2021-09-06T22:55:14+5:302021-09-06T22:55:38+5:30

बिल्डरने केडीएमसी अधिका-यांवर केले गंभीर आरोप 

meeting of builders and officials captured on CCTV | बिल्डर आणि अधिकाऱ्यांची "ती" बैठक सीसीटीव्हीत कैद 

बिल्डर आणि अधिकाऱ्यांची "ती" बैठक सीसीटीव्हीत कैद 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

अनधिकृत बांधकाम व त्यामागील अर्थकारण  अनेकदा उघड झाले आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी - कर्मचारी अनेकदा लाच घेताना पकडले गेले आहेत. पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवरून केडीएमसी  वादग्रस्त चर्चेत आली आहे. केडीएमसी अधिकाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये घेतले मात्र पैसे घेतल्यानंतर देखील इमारत पाडल्याचा  आरोप  एका बिल्डरने केला आहे. इतकंच नाही तर पालिकेचे अधिकारी आणि संबंधित बिल्डरसोबत  एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.तर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे अनधिकृत बांधकामांमुळे बदनाम असलेली केडीएमसी  अधिकारी आणि बिल्डरच्या या बैठकीमुळे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

कल्याण पूर्व भागातील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने नुकतीच  कारवाई केली होती. मात्र  या इमारतीचा बिल्डर मुन्ना  सिंग याने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप करत कारवाई न करण्यासाठी अधिका-यांनी वारंवार पैसे उकळल्याचा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान एका हॉटेलमध्ये बिल्डर सिंग यांच्यासोबत केडीएमसी अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे . बिल्डरच्या आरोपाची  केडीएमसी आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून  या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

सिंग यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे चौकशीअंती समजेलच. परंतु केडीएमसीचे अधिकारी एका हॉटेलमध्ये बसून बेकायदा बांधकाम करणा-या एका बिल्डर सोबत  सुमारे सव्वा तास काय चर्चा करत होते? असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान या प्रकरणावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. बेकायदा बांधकामांचे काय तर अनधिकृत बांधकामाचेही फुटामागे 75 रुपये  घेतले जातात असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला आहे.
 

Web Title: meeting of builders and officials captured on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.