नेवाळीप्रकरणी केंद्रातील बैठक बारगळली

By admin | Published: June 30, 2017 02:40 AM2017-06-30T02:40:27+5:302017-06-30T02:40:27+5:30

नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

The meeting at the Center has begun | नेवाळीप्रकरणी केंद्रातील बैठक बारगळली

नेवाळीप्रकरणी केंद्रातील बैठक बारगळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळी आंदोलनाप्रकरणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी बोलावलेली बैठक झालीच नाही. त्यामुळे नेवाळीप्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
नेवाळी विमानतळासाठी घेतलेली जागा परत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या जागेवर संरक्षण खात्याचा ताबा असून, ती त्यांच्याच नावावर आहे. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यामुळे नौदलाकडून बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीला भामरे यांनी आंदोलनानंतर त्याच दिवशी स्थगिती दिली होती.
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीवर शेतकऱ्यांची व जमीन बचाव आंदोलन समितीची मदार होती. मात्र, ही बैठक झालीच नाही. ती बैठक भामरे यांनी रद्द केलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ही बैठक केंद्रीय संक्षरणमंत्री अरुण जेटली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणे अपेक्षित होते. देशात जीएसटी कर लागू होत आहे. त्यामुळे जेटली त्यात व्यस्त आहेत. जेटली व मुख्यमंत्री नसल्याने या बैठकीतून काही साध्य होणार की नाही, याविषयी शेतकऱ्यांना साशंकता होती. त्यामुळे गुरुवारी बैठकच होऊ शकली नाही, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. परिणामी, कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
पेट्रोल मिळाले कुठून?
नेवाळीच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी व जमीन बचाव आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. त्यासाठी त्यांना पेट्रोल कुठून मिळाले. कोणत्या पंपातून नेवाळी परिसरात बाटलीतून खुली विक्री केली जाते, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या वेळी पेट्रोबॉम्बचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोबॉम्ब टाकून वाहने जाळण्यात आली, असे सांगितले जात असले तरी हा बॉम्ब तयार करण्याची माहिती ग्रामस्थांना नाही. या परिसरातील चाळीत राहणाऱ्या उत्तर भारतीय भाडेकरूंनी हे बॉम्ब तयार केले असावेत. त्याचा या आंदोलनात वापर झाला असल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’-
१शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याला पोलीसच जबाबदार असल्याने या आंदोलनाचे समर्थन करणे योग्य होणार नाही. मात्र, नेवाळीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आगरी, कोळी आणि कुणबी समाजाने ६ जुलैला ‘चलो डोंबिवली’ची हाक दिली आहे.
२नेवाळीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ६ जुलैला या समाजाची बैठक सावित्रीबाई फुले कलामंदिरात दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यात आगरी, कोळी, कुणबी समाजातील डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. भूमिपुत्रांच्या जमिनी सरकारने विकास प्रकल्प राबवण्यासाठी घेतल्या. समाज संघटित नसल्याने त्याच्या गैरफायदा सरकारी यंत्रणांनी घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरतेच या समाजांना वापरत आहेत. त्यांच्यावर अन्याय झाल्यास पक्षाकडून त्यांना मदतीचा हात मिळत नाही.
३नेवाळीतील शेतकऱ्यांनी जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. पोलिसांनी शेतकऱ्यांवर पॅलेट गनने गोळीबार केला. तसेच त्यांना मारहाण केली. त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा करणे, दंगल माजवणे, स्फोटक पदार्थ बाळगून जाळपोळ करणे, विनयभंग करणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यांची धरपकड सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नेवाळीतील आंदोलनकर्ते शेतकरी
यांना मदतीसह मार्गदर्शन करण्याकरिता ही बैठक होत आहे.
नेवाळीत मोठा बंदोबस्त
पोलिसांनी आतापर्यंत ३२ जणांना अटक केली आहे. ६७ जणांविरोधात नावानिशी गुन्हे दाखल केले आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन सुरूच ठेवले आहे. नेवाळीनाक्यावर पोलिसांच्या १० व्हॅन, दंगलविरोधी पथकाची एक गाडी तैनात तसेच बराच बंदोबस्त नेवाळी पोलीस चौकीजवळ आहे.

Web Title: The meeting at the Center has begun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.