संमेलनाध्यक्ष गणेश देवी की काळे?
By Admin | Published: September 24, 2016 02:36 AM2016-09-24T02:36:49+5:302016-09-24T02:36:49+5:30
गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे प्राध्यापक अक्षयकुमार काळे या दोन दिग्गजांची नावे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली
डोंबिवली : भाषांच्या सर्वेक्षणाचे काम करून बोलीभाषांना नवसंजीवनी देणारे प्राध्यापक गणेश देवी आणि कवितेच्या समीक्षेतून गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे प्राध्यापक अक्षयकुमार काळे या दोन दिग्गजांची नावे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. गाढे समीक्षक म.सु. पाटील, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, प्रसिद्ध लेखक रवींद्र शोभणे यांच्याही नावांची चर्चा साहित्य परिषद आणि साहित्य संघाच्या विविध शाखांत सुरू आहे. या सर्वांचा परस्परांवर असलेला गाढ स्नेह आणि परस्परांच्या कामाबद्दल असलेला आदर पाहता ही निवडणूक
बिनविरोध व्हावी, असेही प्रयत्न सुरू आहेत.
साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून डोंबिवलीचे नाव घोषित झाले. त्याबाबतचे अधिकृत पत्रही अजून आयोजक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमला मिळालेले नाही. मात्र, अध्यक्षपदासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे अवघ्या २० दिवसांत नावे सुचवायची आहेत. त्यामुळे मतदानाचा अधिकार असलेल्या वेगवेगळ्या साहित्य संघांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चेचा गलबला सुरू झाला आहे. संमेलन डोंबिवलीत असल्याने तेथील साहित्यिक-सांस्कृतिक वातावरणाचा विचार करून मातब्बर व्यक्तीची
निवड व्हावी, असे प्रयत्न
सुरू आहेत.
लोकभाषा, बोलीभाषांसाठी केलेल्या कामामुळे आणि आदिवासी अकादमीमुळे गणेश देवी यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. अध्यक्ष होण्यास ते तयारही असल्याचे सांगितले जाते. पण त्यांना त्यासाठी निवडणूक लढवण्यात रस नाही; तर कवितेचे समीक्षक अशी ओळख निर्माण केलेले, त्यासाठीच्या व्यासंगामुळे सुपरिचित असलेले अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेले वर्षभर भरपूर तयारी केली आहे. त्यासाठी ते अनेक संस्थांच्या संपर्कात आहेत.
लेखक रवींद्र शोभणे यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले जाते. विचारवंत रावसाहेब कसबे यांचेही नाव पुण्याच्या वर्तुळातून पुढे आले आहे. मुंबई-ठाण्याच्या वर्तुळातून ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, त्यांनी त्याबाबत स्वत:हून इच्छा असल्याबाबत काहीही जाहीर केलेले नाही.
शिवाय, निवडणूक झालीच, तर त्यासाठीच्या प्रचाराची दगदग त्यांना कितपत सोसवेल, असाही पेच त्यांच्या हितचिंतकांपुढे आहे. या सर्वात गणेश देवी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीचे नाव स्पर्धेत आल्यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेकांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे देवी आणि गेले वर्षभर तयारी करून आपला दावा भक्कम करणारे अक्षयकुमार काळे यांच्याच नावावर जोरदार चर्चा झडते आहे. पुढील आठवड्यात साधारण नवरात्रीच्या तोंडावर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
>आयोजकांच्या इच्छेचाही होणार विचार
संमेलनाच्या आयोजक संस्थेला ८० मतांचा कोटा असतो. मतदारांच्या एकूणच हजारभर मतांच्या पसाऱ्यात त्या मतांचे स्थान अल्प आहे. त्यामुळे त्या मतांच्या जोरावर आयोजक संस्थेला आपल्या इच्छेनुसार अध्यक्षांची निवड करता येत नाही. परंतु, यंदाची आयोजक संस्था आगरी युथ फोरम असल्याने आगरीला बोलीभाषेच्या पटलावर आणणारे गणेश देवी आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात वावर असल्याने म.सु. पाटील यांच्या नावांची चर्चा डोंबिवलीच्या साहित्यवर्तुळात आहे.
त्यातील पाटील हे संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणात न उतरल्यास गणेश देवी यांच्या बाजूने आयोजकांचा कल असेल. त्यांनी साहित्य महामंडळाला त्यासाठी गळ घातली, तर महामंडळ त्यासाठी विविध शाखांशी संपर्क साधून त्यांचे मत वळवू शकते. त्यातही महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा देवी यांच्याशी स्नेह आहे. त्यामुळे तेही याबाबत पुढाकार घेत प्रयत्न करू शकतात. शिवाय, देवी यांच्यासारखे नाव पुढे आले, तर अक्षयकुमार काळे अध्यक्षपदासाठी वर्षभर थांबण्यास तयार होतील, असाही साहित्यवर्तुळाचा होरा आहे.
>अक्षयकुमार काळे यांची साहित्यसंपदा
सूक्तसंदर्भ, कविता कुसुमाग्रजांची, अर्वाचीन मराठी काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता-आकलन, आस्वाद आणि चिकित्सा, ग्रेसविषयी, प्रतितिविभ्रम, गालिबचे उर्दू काव्यविश्व-अर्थ आणि भाष्य हे समीक्षा ग्रंथ. गोविंदाग्रज-समीक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-व्यक्ती आणि
वाङ्मय, सांप्रदायिक सद्भाव आणि शांतता हे
संपादित ग्रंथ.
>गणेश देवी यांची साहित्य संपदा
वानप्रस्थ (मराठी), आदिवासी जाणे छे (गुजराथी), आॅफ मेनी हीरोज (इंग्रजी), आफ्टर अॅम्नेसी (इंग्रजी), इंडिया बिटवीन ट्रॅडिशन अॅण्ड मॉडर्निटी (इंग्रजी), इंडियन लिटररी क्रिटिसिझम : थिअरी अॅण्ड इंटरप्रिटेशन (इंग्रजी), इन अनदर टंग (इंग्रजी), की वर्डज : ट्रूथ (इंग्रजी), क्रिटिकल थॉट (इंग्रजी), द जी. एन. देवी रीडर (इंग्रजी), ए नॉमॅड कॉल्ड थीफ (इंग्रजी), पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे आॅफ इंडिया, पेण्टेड वडर््ज : अॅन अॅन्थॉलॉजी आॅफ ट्रायबल लिटरेचर (इंग्रजी).
>विदर्भावर बरेच काही अवलंबून
महामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्याने राज्याच्या सत्तावर्तुळात विदर्भाला महत्त्व आल्याने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीतही विदर्भाचा कौल महत्त्वाचा ठरेल, असा अंदाज आहे. संमेलनाचे स्थळ घोषित करताना पुणे आणि विदर्भातील संघर्ष समोर आला होता. तो टाळण्यासाठी अध्यक्षपद हे चांगले निमित्त आहे. विदर्भातून दरवर्षी एकगठ्ठा मतदान होते. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या मतदानावरही विदर्भाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे अक्षयकुमार काळे यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. शिवाय, त्यांनी बडोदा, आंध्र प्रदेशमधूनही जोर लावला आहे. मुंबई-पुण्यातही त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, गणेश देवी यांचे नाव पुढे आल्यास हे चित्र बदलू शकते. पुणे-विदर्भाचे मनोमिलन होऊ शकते.
>मतदानाचा अधिकार कोणाला? :
संमेलनाध्यक्षपदासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत नावे सुचवली जातील. त्यानंतर, गरज पडली तर मतदान होईल. तसे झाले, तर कोणाकोणाला मतदानाधिकार असेल, याचा धांडोळा-मसाप पुणे, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांना प्रत्येकी १४० मतांचा कोटा आहे. मसाप आंध्र प्रदेश, मसाप छत्तीसगढ, गुलबर्गा साहित्य संघ, गोमंतक साहित्य परिषद यांना प्रत्येकी ७५ मतांचा कोटा आहे. वाङ्मय परिषद बडोदा यांच्याकडे १०, महामंडळाच्या विश्वस्त निधीची पाच, हयात संमेलनाध्यक्षांची मते आणि आयोजक संस्थेला असलेला ८० मतांचा कोटा विचारात घेता साधारण हजारभर मतदारांतून अध्यक्ष निवडले जातात. यातील विदर्भात चर्चा-विनिमय करून एकगठ्ठा मते देण्याची परंपरा आहे. तेथील मतदान १०० टक्के होते. उरलेले मतदान उमेदवार, परिसर आणि त्या त्या वेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर अवलंबून असते.