अकोटच्या भंडारजमध्ये भरले आजींचे संमेलन
By admin | Published: October 4, 2016 04:10 PM2016-10-04T16:10:47+5:302016-10-04T16:12:08+5:30
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून भंडारज येथे राज्यातील पहिले आजी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
आकोट, दि. ४ - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून भंडारज येथे राज्यातील पहिले आजी संमेलन उत्साहात संपन्न झाले. मातृसेवा सोशल सेंटर भंडार, ता. अंजनगाव येथे आजी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कालबाह्य होत चाललेल्या आजीच्या गोष्टी, आजीची चंचई, जात्यावरची गाणी, नातवंडाचे लाड या व इतर गोष्टींना या संमेलनातून नवीन उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आजी ही आज दुर्लक्षित झाली आहे. तिच्या शारीरिक कमजोरीमुळे, तिच्या समस्या भावनांना वाचा फोडून तिच्या व्यथा ऐेकण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली. गटचर्चामध्ये दैनंदिन जीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आली. आजची आजी सक्षम आहे का, या व इतर प्रश्नांवर गटचर्चा घेण्यात आली.त्याला आजींनीही चांगला प्रतिसाद दिला. हा उपक्रम सोशल सेंटरच्या संचालिका सी. संगीता, सी. किरण व साधना यांनी राबवला. कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून नरेंद्र काकडे व दीपक अभ्यंकर यांनी काम पाहिले. दुपारी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनामध्ये भंडारज, अडगाव खाडे, चिचपाणी, खिरकुड,चौसाळा व इतर आदिवासीबहुल गावातील आजींनी उपस्थिती दर्शवली. सुमनबाई राक्षसकर, कमलाबाई, गीताबाई, विसाबाई राक्षसकर, पंचफुला बेलसरे, ललिता भास्कर, तुळसीबाई जामुनकर आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी शरद पफोकमारे, रमेश दोड, मनीष यांनी कार्यक्रमासाठी मदत केली.
अन् आजीला रडू कोसळले
संयुक्त कुटुंब आता विभक्त झालीत. मुलांसोबत संवाद होत नाही, अशा आपल्या भावना व्यक्त करताना एका आजीला रडू कोसळले. पाणावलेल्या डोळ्यांनी या आजीने आपली व्यथा कथन केली.
संमेलनातील ठराव
वषार्तून किमान दोन वेळा संमेलन घेण्यात यावे
गावागावात आजींची संघटना स्थापन व्हावी
आजी समुपदेशान केंद्र व्हावे
आजींनी धरला नृत्याचा फेर
सांस्कृतिक कार्यक्रमात आजींनी जुन्या व नवीन गाण्यांवर नृत्याचा फेर धरून सर्वांनाच आश्चयार्चा धक्का दिला.